spot_img
महाराष्ट्र'वारकरी' शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

spot_img

नगर सहयाद्री टीम: “विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष” याने आसमंत भारून जातो, तेव्हा समजते की वारी आली आहे! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील एक अनमोल परंपरा म्हणजे आषाढी वारी. ही फक्त पदयात्रा नसून, ती आहे भक्ती, समर्पण आणि सामुदायिक एकात्मतेचा जगद्विख्यात उत्सव. वारी ही साधारणतः २५० किमीची पदयात्रा असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होतात. टाळ, अभंग, कीर्तन, भजन यांच्या गजरात वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात.

‘वारी’ आणि ‘वारकरी’ शब्दाचा उगम
‘वारी’ म्हणजे विशिष्ट दिवशी विशिष्ट स्थळी जाण्याची परंपरा. ‘वारकरी’ म्हणजे ही वारी करणारे. संत तुकाराम महाराजांच्या “सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार” या अभंगातून वार आणि वारी यांचा संबंध दिसतो. वारकरी संप्रदायाचे मुख्य लक्षण म्हणजे विठ्ठलाच्या भेटीसाठी दरवर्षी पंढरपूरला पायी जाणे.

वारीचा इतिहास
वारीचा नेमका प्रारंभ कधी झाला हे निश्चित सांगता येत नसले तरी, १३व्या शतकात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत गोरोबा काका यांच्या साहित्यात विठ्ठल, पंढरपूर आणि वारीचा उल्लेख आढळतो. या काळात वारी प्रस्थापित संप्रदाय म्हणून मानली जात होती. इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या मते, वारी संत ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या अगोदरही अस्तित्वात होती.

पालखी परंपरेचा उदय
जुनी असणारी वारी परंपरा असली तरी ‘पालखी’ परंपरा तुलनेने नंतर उदयास आली. संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये पहिल्यांदा पालखी सोहळा सुरु केला. त्यांनी संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन एकत्र वारी सुरु केली. पुढे १८३२ मध्ये दोन्ही पालख्या स्वतंत्र झाल्या.आज महाराष्ट्रातून २०० ते २५० पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात. या पालख्यांमध्ये संत ज्ञानेश्वर (आळंदी), संत तुकाराम (देहू), संत एकनाथ (पैठण), संत गजानन महाराज (शेगाव), संत सोपानकाका (सासवड), मुक्ताई (कोथळी) यांच्या पालख्यांचा समावेश आहे. काही पालख्या ३०-३३ दिवस आणि ५५०-६०० किमीचा प्रवास करतात.

रिंगण सोहळा: भक्तीचा उत्कट क्षण
वारीतील एक विशेष आकर्षण म्हणजे ‘रिंगण सोहळा’. मराठा सरदारांनी लष्करी छावणीच्या धर्तीवर रिंगण परंपरा सुरु केली. रिंगणात अश्वांची शर्यत, तुळशी वृंदावन घेऊन महिलांची धाव, पताकाधारी वारकऱ्यांची शिस्तबद्ध हालचाल आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहण्यासारखे असते. विशेष म्हणजे संत तुकाराम आणि सोपानकाका यांच्या पालखीत मेंढ्यांचे रिंगणही पाहायला मिळते.

वारी का केली जाते?
वारी ही केवळ देवदर्शनाची प्रक्रिया नाही, ती सामूहिक भक्तीची अनुभूती आहे. विठ्ठलाच्या चरणी मन अर्पण करण्याचा मार्ग. “माउली” ही सगळी नाती विसरून एकमेकांना केलेली हाक, हे वारीचे खास वैशिष्ट्य. वारीतून फक्त भक्ती नव्हे, तर बंधुभाव, सामाजिक समरसता आणि अनुशासन यांचा संदेश दिला जातो.

वारी: महाराष्ट्राची ओळख
वारी आणि वारकरी संप्रदाय वगळून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची ओळखच पूर्ण होऊ शकत नाही. आजही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने जपली जाते. विठ्ठलाच्या ओढीने लाखो माणसं पंढरीकडे निघतात आणि ‘ज्ञानोबा-तुकोबा’च्या नामगजरात सामील होतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...