मुंबई / नगर सह्याद्री –
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं. तसेच आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असंही कोर्टाने म्हटलय
सध्या आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक वावरताना दिसतायत. CSMT परिसर मराठा आंदोलकांनी व्यापून टाकलेला दिसतो. मराठा आंदोलकांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मराठा आंदोलक रेल्वे स्टेशन, परिसरात कबड्डी, खो-खो खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रस्त्यावर मराठा आदोलकांनी आंघोळ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
आंदोलनामुळे यंत्रणा ठप्प – सदावर्ते
हायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत. आंदोलक गाड्यांचे लायसन्स आहे का? असे वाहनधारकांकडे विचारात आहेत, रेल्वे ट्रॅकवर उतरत आहेत, सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असं म्हणत सदावर्तेंनी सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले.
शरद पवार-उद्धव ठाकरेंची आंदोलनाला मदत
आपल्या युक्तिवादात पुढे सदावर्ते यांनी यात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. सदावर्ते म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लोक यांना अन्नधान्य ट्रकच्या माध्यमातून पुरवत आहेत. अंतरावालीत सराटीत पोलिसांना मारहाण झाली, महिला पोलिसांनाही मारहाण झाली. काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, पाण्याच्या बॉटल फेकल्या. महिला पत्रकारांची छेड काढली जात आहे असंही सदावर्ते म्हणाले.
“सगळ्या नियमांच उल्लंघन केलं, मुंबईत कोणालाही येऊ देऊ नका..”; हायकोर्टाच्या सरकारला सूचना
मनोज जरांगे यांचे चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. आंदोलनामुळे सीएसएमटी, बीएमसी रोडवरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
सध्या न्यायालयात जरांगे यांच्या आंदोलनाविरुद्ध याचिकेवर सुनावणी सुरू असून जरांगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत.
महाधिवक्ता आणि सदावर्तेंकडून युक्तीवाद सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई खोळंबली असून हे आंदोलन नियमबाह्य आहे, असे यावेळी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे.
तर महाधिवक्त्यांनीही जरांगे यांनी आंदोलनाचे नियम पाळले नाहीत, असे सांगितले आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करू, अशी हमी जरांगे यांनी दिली होती. त्यामुळेच जरांगे यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती.
मात्र आंदोलकांनी नियमांचे पालन केले नाही, असे महाधिवक्त्यांनी या सुनावणीदरम्यान सांगितले. त्यामुळे, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यापुढे परवानगी मिळणार की नाही हे पाहावे लागेल.
दरम्यान, हायकोर्टाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले असून मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. मुंबईत संपूर्ण उच्च न्यायालय परिसराला घेराव घालण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत, त्यांना उच्च न्यायालयात येण्यापासून अडवण्यात आल्याचं न्यायमूर्तींकडून स्वतः सांगण्यात आलं.
तसेच, मुंबईत अजून आंदोलनकर्ते येत आहेत, त्यांना कसं अडवणार अशी विचारणाही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. न्यायालयाने आजच्या सुनावणी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. दरम्यान, सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या बाहेर मराठा आंदोलक अनेक ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळालं. एमी फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाच उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांकडून कोर्टाला सांगण्यात आलं. मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने कोर्टात केला आहे. तर, आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असल्याचा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात केला आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत अडाते हेही उच्च न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, आंदोलकांकडून देखील आज उच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आली असून कैलास खांडबहाले यांच्याकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.
परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती….
केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्यांने केला आहे. तसेच, दुसरीकडे आंदोलन करण्यास परवानगी नाही, परवानगी फक्त एका दिवसासाठी देण्यात आली होती, अशी बाजू राज्य सरकारने मांडली. आंदोलकांकडून लिहून देताना सगळ्या अटी पाळण्यात येतील असं मान्य केलं होतं, त्याआधारे परवानगी देण्यात आली होती अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली. कोर्टाने नियमात राहून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, त्यानुसार परवानगी देण्यात आली होती. आझाद मैदान हे आंदोलनासाठी आरक्षित आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त कुठेही आंदोलन करण्यास परवानगी नाही, असेही सरकारने म्हटले आहे.
शहर एक खेळाचं मैदान झालं…
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. राज्य सरकारने दिलेल्या परवानगीवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
तसेच, ध्वनिक्षेपकांच्या वापरला विनापरवाना वापरण्यास परवानगी दिली नाही, आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अटी शर्ती पाळून परवानगी मागितली होती, म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यातही, 5000 लोकांचा जमाव असेल आणि 1500 वाहन असतील, असे सांगण्यात आले होते. तुम्ही सगळ्या नियमांच उल्लंघन केल्याचं राज्य सरकारने वेळो-वेळी जरांगे पाटील यांना सांगितलं. बैलगाड्या चावल्या जात आहेत, शहर एक खेळाचं मैदान झालं आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली. आंदोलक सगळीकडे आहेत, फ्लोरा फाऊंटनमध्ये आहेत, सीएसएमटी स्थानकात आंदोलक आहेत, असे म्हणत राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात फोटोही दाखवण्यात आले. त्यामुळे, याचा काय तोडगा काढणार अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती.
‘जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असेल तर…’, शशिकांत शिंदेंनी दिले ओपन चॅलेंज
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. “जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही. एकतर आरक्षण मिळेल, नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल,” अशी ठाम आणि आरपारची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, ज्यामुळे आंदोलक आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आंदोलनाला राजकीय वळण लागले असून, सत्ताधारी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे की, जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच शरद पवार यांचे पाठबळ आहे. या आरोपांना प्रत्युत्तर देताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आहे. “जर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल, तर सरकारने तसे सिद्ध करून दाखवावे,” असे शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, “सरकारकडे सर्व यंत्रणा आणि संसाधने आहेत. जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा दावा करत असाल तर ठोस पुरावे सादर करा. शरद पवार काही बोलले नाहीत, तर सत्ताधारी म्हणतात की त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि जर पवार यांनी आंदोलनाबाबत काही बोलले, तर त्यांच्यावर आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला जातो. ही दुटप्पी भूमिका आहे.” शिंदे यांनी पुढे मराठा आंदोलनाच्या स्वरूपावरही भाष्य केले. “हे आंदोलन स्वयंस्फूर्त आहे की कुणाच्या पाठबळावर सुरू आहे, हे सरकारने तपासावे. लोकांमध्ये गैरसमज पसरवून राजकारण करणे थांबवावे. सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे आणि तातडीने निर्णय घ्यावा. समितीच्या अहवालाची वाट न पाहता, सरकारने त्वरित बैठक घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर ठोस पावले उचलावीत,” अशी मागणी शिंदे यांनी केली.
जरांगें पाटलांचे आंदोलकांना मोठं आवाहन
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मुंबईतील सीएसएमटी परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्रता वाढू लागल्याने प्रकरण कोर्टात गेलंय. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना मोठं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘सगळ्यांना पोरांना निरोप द्या, पाटलांना डाग लागले. पाटलांना त्रास होईल, अशी कोणती गोष्ट करू नये, असं सर्व ठिकाणी असणाऱ्या समाज बांधवांना सांगा’. ‘माझा अंग थरथर होत आहे. माझ्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ नये. आतापर्यंत माझा समाज माझ्या शब्दाच्या पुढे गेला नाही. ही मला पक्की गॅरंटी आहे’, असेही ते म्हणाले.