छत्रपती संभाजीनगर | नगर सह्याद्री
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत ठाण मांडून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने कूच करतील. त्यानंतर मराठा मोर्चा मार्ग आणि नियोजन कशाप्रकारे असेल, याची तपशीलवार माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. ते गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
अंतरवाली सराटी ते मुंबई हे अंतर मनोज जरांगे पायी पार करणार आहेत. त्यांच्यासोबत येणार्या मराठा आंदोलकांनी कशाप्रकारे तयारी करावी, याबद्दल मनोज जरांगे यांनी अनेक सूचना दिल्या. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा हा प्रथम बीडमध्ये दाखल होईल.
त्यानंतर हा मोर्चा जालना-शहागड,-गेवराई-अहमदनगर-शिरुर-शिक्रापूर, रांजणगाव-खराडी-शिवाजीनगर-पुणे-लोणावळा-पनवेल- वाशी-चेंबूर-शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात दाखल होतील. अंतरवाली सराटीहून मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होईल. या तुकडीच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यावी. कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.