सुपा | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील शहाजापुर, सुपा, हंगा क्षेत्रातील वन विभागाला बुधवारी दुपारी मोठी आग लागून शेकडो एकर वन क्षेत्र जळून खाक झाले आहे. तर चारा, वृक्ष व छोटे जिव जंतु जळून खाक झाले. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेकडो एकर वन क्षेत्र, हजारो लाखो वृक्ष व मोठ्या प्रमाणात जंगली वन्य जीव असलेल्या या वन विभागात बुधवारी मोठी आग लागली. व शेकडो एकर वन क्षेत्र, त्यावरील अगणीत चारा, वृक्ष व छोटे मोठे जीव जंतू जळून खाक झाले आहेत. जर वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेवर या वन क्षेत्राकडे लक्ष दिले असते तर मोठा अनर्थ टळला असता.
दोन दिवसापुवच काळे परिवाराने येथील वन्य जीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडले होते. त्यानंतर समाजातील दानशुरांना या मुक्या जीवांसाठी पाणी सोडण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाला अनेकांनी प्रतिसाद दिला होता. ते टप्याटप्याने पाणवठ्यात पाणीही सोडणार होते. परंतु वन विभागाच्या गलथान कारभारामुळे सर्वाचीच राख रांगोळी झाली. वन विभागाने कधीही पाणवठ्यात पाणी सोडले नाही, कधी पाणवठा दुरुस्त केला नाही. तसेच कधीही त्या वन क्षेत्राचे संरक्षण केले नाही. त्या पाणवठ्या भोवताली दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस अनेक तळीराम मद्य पित बसतात. कदाचित त्या तळीरामाच्या बिडी काडीमुळे आग लागलेली असू शकते. याला सर्वस्वी वन अधिकारी जबाबदार असल्याने परिसरातील नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
भयाण उन्हाळ्यात वन्य जीव जगावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार लोकांच्या हातापाया पडून पाणी मिळवत असताना वन विभागाच्या गलथान कारभारामुळे अख्खे फॉरेस्टच जळून खाक झाले आहे. जर जाळ पट्ट्या वेळेत मारल्या असत्या तसेच तेथील रखवालदार (वॉचमन) नियमित हजर असता व संपूर्ण जंगलात तसेच पाणवठ्याजवळ प्राणी सोडून कुणालाही थांबून दिले नसते तर आग लागली नसती. जेथे जंगलातील जीवजंतू जगले पाहिजे म्हणून नागरिक मदत करत असताना वन अधिकार्यांच्या बेजबाबदार पणामुळे जंगलच जळाले आहे. यावर अनेक नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.