अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
पाथर्डी तालुक्यात आणि नगर परिसरात भीती निर्माण करणाऱ्या घरफोडी व जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, ५ लाख २२ हजार रुपये किमतीचे सुमारे ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच, एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर टोळीतील तीन आरोपी फरार आहे.
दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी दत्तनगर, पाथर्डी येथे राहणाऱ्या श्रीमती मीरा दहिफळे यांच्या घरात रात्रीच्या सुमारास खिडकी फोडून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दि. १६ जून २०२५ रोजी चांदणी चौक, अहिल्यानगर येथे सापळा रचून खालील तीन आरोपींना अटक करण्यात आली
आरोपीमध्ये गणेश दिवाणजी काळे, रोहित नादर चव्हाण, रोहित लल्या भोसले यांचा समावेश आहे. तर टोळीतील रावण नादर चव्हाण, फिलीप नादर चव्हाण व नागु पंडया भोसले हे आरोपी फरार आहे. तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी केलेले दागिने, अंगठ्या, गंठण, झुंबर, कानातील फुले असा एकूण ५ लाख २२ हजार रुपयांचे दागिने जप्त केले. तपासादरम्यान टोळीने पाथर्डी, नगर तालुका व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत केलेले सहा गुन्हे उघडकीस आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.