नाशिक / नगर सह्याद्री
राज्यात सूर्य आग ओकू लागल्याने वाढत्या तापमानामुळे नागरिकांची अंगाची लाहीलाही होतांना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या घरात गेला आहे. तर काही ठिकाणी ४२ ते ४३ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. यात काल नाशिकचा पारा ४१ तर मालेगावचा ४२ अंशांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर आज (बुधवार) तापमानाने उच्चांक गाठला असून नाशिकमध्ये ४२ अंशांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे नागरिकांना चांगलेच उन्हाचे चटके जाणवत आहे.
मालेगावमध्ये रविवारपर्यंत ४० अंशावर स्थिरावलेल्या तापमानाच्या पाऱ्याने दोन दिवसात कमालीची उसळी घेत मंगळवार (दि.०८) रोजी ४२.६ अंशांवर पोहोचला. फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानाचा पारा वाढू लागला होता. मार्च महिन्यात ३८ अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने यंदा उन्हाळा भाजून काढणार असल्याचे दिसून आले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या गारपिट व अवकाळी पावसाने पारा काहीसा घसरला होता. मात्र, शनिवारी पारा पुन्हा ४०.६ अंशांवर स्थिरावला होता. यानंतर सोमवारी ४१.६ अंशांवर असलेले तापमान काल (मंगळवारी) ४२.६ अंशांवर पोहचले होते. त्यामुळे सकाळपासूनच सूर्यनारायणाच्या तप्त झळांनी मालेगावकर अक्षरशः भाजून निघाले होते.
दुसरीकडे नाशिकमध्येही मालेगावसारखी परिस्थिती जाणवली. रविवारी तापमानाने ०.१ अंशांचा टप्पा ओलांडला होता. यानंतर सोमवारी दुसऱ्या दिवशी पारा ४०.३ अंशांवर गेला तर मंगळवारी तापमान ४१ अंशांवर स्थिरावले होते. त्यानंतर आज (बुधवारी) हा पारा तब्बल ४२ अंशांवर पोहोचला. तळपते ऊन आणि कमालीचे शुष्क वातावरण यामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून रात्रीही प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
दरम्यान, गतवर्षी मे महिन्यात ४२ अंशांची नोंद झाली होती. यंदा एप्रिलमध्येच सूर्य आग ओकू लागला आहे. सध्या आर्द्रतेचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे वातावरणात कोरडेपणा जाणवत असल्याचे दिसत आहे. तर येत्या तीन ते चार दिवसात हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या राज्यांमध्ये जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तरेकडे अवकाळी पाऊस आणि महाराष्ट्रात उष्णतेचा कडेलोट होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.