पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे गेल्या रविवार दि. ०२ नोव्हेंबर रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय घोडी ठार झाली. पांडुरंग गायखे यांच्या शेतात नांदगाव शिंगवे येथील धनगर पांडुरंग कोळेकर यांनी मेंढ्यांसह तळ ठोकला होता. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक हल्ला करून घोडीला ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वासुंदे आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, यापूर्वी अनेक कुत्र्यांवरही हल्ले झाले आहेत. स्थानिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. तसेच, आणखी पिंजरे लावण्याचे नियोजन आहे, असे वनाधिकार्यांनी सांगितले. मृत घोडीचा पंचनामा करून वन खात्याने नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
परिसरातील नागरिकांनी बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे सुरक्षेची मागणी केली आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास पशुधनासह मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.



