नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील भागात ५० प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान कोसळले असून, सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे. हे विमान सोव्हिएत काळातील होते आणि जवळजवळ ५० वर्षे जुने होते. त्याच्या टेल क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले होते असे दिसून येत आहे.
उड्डाणाच्या दरम्यानच विमान वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच बचाव पथकांना घटनास्थळी विमानाच्या जळालेल्या अवशेषांचे काही भाग आढळून आले. स्थानिक आपत्कालीन सेवा मंत्रालयाच्या माहितीनुसार, अंगारा एअरलाइन्सचे An-24 हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ पोहोचत असतानाच रडारवरून बेपत्ता झाले.
प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करताना पायलटची चूक झाल्यामुळे हा विमान अपघात झाला असण्याची शक्यता आहे.
SHOT या वृत्तसंस्थेनुसार, अंगारा एअरलाइन्सचे विमान चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते परंतु ते रडार स्क्रीनवरून बेपत्ता झाले. रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सनुसार, टिंडा विमानतळावर विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, वैमानिकाने दुसऱ्यांदा प्रयत्न केला परंतु या दरम्यान एटीसीचा विमानाशी संपर्क तुटला.
या अपघाताबाबत बोलताना प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार, विमानात पाच मुलांसह ४३ प्रवासी होते, ज्यात सहा क्रू मेंबर्स होते. “विमानाचा शोध घेण्यासाठी सर्व आवश्यक सैन्य आणि संसाधने तैनात करण्यात आली आहेत.”
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, याच अमूर प्रदेशात नोंदणीकृत नसलेल्या उड्डाणादरम्यान रॉबिन्सन आर६६ हेलिकॉप्टर तीन जणांसह बेपत्ता झाले होते. हा प्रदेश मॉस्कोपासून अंदाजे ६,६०० किमी पूर्वेला आहे.