Crime News: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेदिवस ढासळू लागली आहे. जिल्ह्यातील राहता तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणांचे पूर्ववैमनस्यातून ६ जणांनी अपहरण करून खून केल्याचा प्रकार घडला. थोरल्या भावासोबतच्या वादामुळे धाकट्या भावाचा जीव घेतल्याची चर्चा परिसरात पसरली आहे. प्रतीक वसंत सदाफळ असे मृत तरूणाचे नाव आहे.
शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास प्रतीकचे अपहरण झाले. गणेश नगर येथील निर्मळ हॉस्पिटलसमोरून संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारमधून त्याचं अपहरण केले. संशियतांनी प्रतीक याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, त्यामध्ये त्याचा जीव गेला. खून लपवण्यासाठी मृतदेह सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरण परिसरात नाल्याजवळ फेकून दिला.
सोमवारी सकाळी शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला रस्त्याकडेला मृतदेह दिसल्याने गावच्या पोलिस पाटलांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.या प्रकरणी मयत प्रतीकचा मोठा भाऊ रितेश सदाफळ याने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये भावाचा खून झाल्याची फिर्याद नोंदवली. रितेशच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
रितेशने दिलेल्या फिर्यादीनुसार, रितेश आणि संशयित आरोपींमध्ये आधीपासून वैमनस्य होते. आरोपींना रितेशला जाळ्यात ओढायचे होते. पण तो फसला नाही. त्याच रागातून संशयितांनी प्रतीकवर हल्ला केला. पोलिसांनी प्रशांत जाधव, अक्षय पगारे, चंदू तहकीत, ओमकार रोहम, प्रवीण वाघमारे आणि सोनू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.