Shocking News: हुंड्यांची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला अॅसिड पाजण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अघोरी प्रकारामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घटना घडली आहे. हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेला अॅसिड पाजण्यास भाग पाडल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पीडितेचा १७ दिवसांनंतर मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाकबारा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी फुररान यांची मुलगी गुल फिजा हिचा विवाह एक वर्षापूर्वी अमरोहाच्या दिदौली कोतवाली हद्दीतील काला खेडा येथील परवेजशी झाला होता. लग्न ठरण्यापासूनच हुंड्याची मागणी करण्यात येत होती. लग्नानंतरही हा छळ सुरुच राहिला.११ ऑगस्ट रोजी, पीडितेच्या सासरच्यांनी जबरदस्तीने अॅसिड पाजले, असा आरोप तिच्या वडिलांनी पोलिसांत नोंदवला आहे.
यामुळे गुल फिजाची प्रकृती अत्यवस्थ झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, १७ दिवसांच्या उपचारांनंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून, तिच्या पती, सासू-सासऱ्यांसह इतर सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ, मारहाण, आणि आता हत्येच्या गुन्ह्यांसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.