अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
शहरालगतच्या अरणगाव शिवारातील मेहेरबाबा ट्रस्ट फॉरेस्ट परिसरात शेळ्यांना युरियामिश्रित चारा खाऊ घातल्यामुळे १३ शेळ्या आणि एक पिलू ठार झाले आहे. या घटनेत शेळीपालक महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. सोनेवाडी (चास) येथील ३४ वर्षीय शेळीपालक महिलेच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तुकाराम सदाशिव नाट, साक्षी तुकाराम नाट, सुनिता तुकाराम नाट व दत्ता साहेबराव नाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. आरोपींनी शेळीपालक महिलेच्या शेळ्यांना अरणगाव शिवारातील नवीन बायपास रोड परिसरात बेकायदेशीररित्या कोंडून ठेवले. यानंतर आरोपींनी शेळ्यांना युरियामिश्रित चारा खाण्यास दिला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. यात ६० हजार रुपये किमतीच्या चार मोठ्या शेळ्या आणि १२ हजार रुपये किमतीची तीन पिले जागीच ठार झाली.
तर १ लाख ९५ हजार रुपयांच्या तेरा मोठ्या शेळ्या व एक लहान पिलू मरणासन्न अवस्थेत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित महिलेने १२ नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खरात करत आहेत.



