Accident News: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने रस्त्यावर चालणाऱ्या सहा पादचाऱ्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की, काहींचा मृत्यू जागीच झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.
अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरले होते. दरम्यान, बीड ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनरच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून, पोलीस तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.