Accident News: नाशिकरोडच्या मुक्तिधाम मंदिर परिसरातील भीषण अपघाताने एक कुटुंब हादरले आहे. सुनीता भीमराव वाघमारे (वय ५०) यांचा आणि बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या त्यांच्या आठ महिन्यांच्या गरोदर मुलीचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत पोटातील बाळालाही प्राण गमवावे लागले.
मंगळवारी संध्याकाळी बिटकोहून मालधक्का रोडकडे जात असलेल्या ट्रकने नियंत्रण गमावून, प्रथम रस्त्यावरील कारला धडक दिली. त्यानंतर बाजूला उभ्या दोन रिक्षांनाही जोरदार धक्का दिला. ट्रकने रस्ता ओलांडत असलेल्या सुनीता वाघमारे आणि त्यांच्या गरोदर मुलीला चिरडले.
अपघातानंतर जखमींना तत्काळ नागरिकांच्या मदतीने बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र, उपचार सुरू असताना सुनीता वाघमारे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद केदारे यांना एका खासगी रुग्णालयात हलवले गेले, पण दुर्दैवाने शीतल आणि त्यांच्या पोटातील बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नाशिकरोडमधील मुक्तिधाम मंदिरासमोरील रस्ता नेहमीच अतिक्रमण आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे धोकादायक ठरतो. नागरिकांनी याबाबत पोलिस आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली असली तरी समस्या अद्याप सुटलेली नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावरील अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.