Maharashtra Crime News : एक अत्यंत धक्कादायक आणि अमानवी घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत फेकल्याचे उघड झाले आहे. हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हे मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
दरम्यान, पोलीस तपासात बेनाडे यांचा मृतदेह संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत दोन भागांत आढळून आला.पोलिसांच्या माहितीनुसार, मारेकर्यांनी मृतदेहाचे तुकडे करून अर्धवट जाळून नदीत फेकला, जेणेकरून ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट करता येईल. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचे संकेत आहेत.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. लखन बेनाडे यांचा एका महिलेबरोबर गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादाचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या महिलेबरोबरचे त्यांचे अनैतिक संबंध आणि वाद हाच खून घडण्यामागील संभाव्य कारण असल्याचा प्राथमिक तपासातून पोलिसांचा अंदाज आहे.
या निर्घृण हत्येने रांगोळी गाव आणि आसपासच्या परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. एक सक्रिय ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अशा पद्धतीने ठार मारला जाणे हे संपूर्ण जिल्ह्यासाठी हादरवून टाकणारे आहे. पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे.पोलिसांनी याप्रकरणी हत्या, पुरावा नष्ट करणे, आणि कट रचणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.