नगर सह्याद्री वेब टीम :
डहाणू शहरातील लोणीपाडा येथून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चौथे अपत्यही मुलगी झाल्याच्या नैराश्यातून जन्मदात्रीनेच आपल्या चिमुकल्याचा गुदमरून जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पूनम शहा (वय-३३, रा. कोलकाता, सध्या लोणीपाडा, डहाणू) या महिलेने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी मध्यरात्री बाळाचे नाकतोंड दाबून जीव घेतला.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम शहा हिची काही दिवसांपूर्वी डहाणूतील लोणीपाडा येथे सुरक्षित गृहप्रसूती झाली होती. चौथे अपत्य जन्माला आले होते. परंतु पुन्हा मुलगी झाल्याचे समजल्यावर ती नैराश्याच्या गर्तेत सापडली. प्रसूतीनंतर बाळासह तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री तिने रुग्णालयातच आपल्या बाळाच्या नाकातोंडावर हात ठेवून जीव घेतला.
या प्रकाराची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने डहाणू पोलीस ठाण्यात तातडीने माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत बाळाचा ताबा घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक चौकशीत पूनम शहा हिने मुलगी झाल्याने नैराश्य येऊन बाळाला ठार मारल्याचे कबूल केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.