अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या 33 वषय डॉक्टर महिलेला गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या कृत्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असून, लग्न करून धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. ’गझवा-ए-हिंद’ करायचा आहे, असे सांगत मानसिक दबाव टाकल्याची नोंदही फिर्यादीत करण्यात आली आहे. पीडित डॉक्टर महिलेने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी इरफान शेख (रा. माळीवाडा, ता. जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी : पीडित डॉक्टर महिला आणि आरोपी इरफान शेख यांची ओळख 2022 मध्ये एका रुग्णालयात झाली होती. ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेला वेगवेगळ्या कारणांनी धमकावण्यास सुरुवात केली. मार्च 2025 मध्ये त्याने माफी मागण्याच्या बहाण्याने पीडितेला एका खासगी ठिकाणी बोलावले. तेथे त्याने पीडितेला चॉकलेट दिले, जे खाल्ल्यानंतर पीडितेला चक्कर येऊ लागली.
याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केला. तो तिला सतत लग्न करण्यास, धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडत होता. त्याने गझवा-ए-हिंद करायचा आहे, असेही पीडितेला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध अत्याचार, धमकी, धर्मांतरास भाग पाडणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे