spot_img
अहमदनगरउमेदवाराच्या भाषेपेक्षा त्याचे सामाजिक भान महत्त्वाचे!

उमेदवाराच्या भाषेपेक्षा त्याचे सामाजिक भान महत्त्वाचे!

spot_img

‘एमडी‘ झालाय की ‘आयटीआय’ हे महत्त्वाचे नाहीच | शिक्षणापेक्षाही उमेदवार व त्याच्या सहकार्‍यांची वागण्या-बोलण्यासह प्रत्यक्ष कृतीतील भाषा महत्त्वाची

सारिपाट / शिवाजी शिर्के
उमेदवाराला इंग्रजी- हिंदी बोलता येते का? या मुद्यावर नगरचं राजकारण गेली दोन- तीन दिवस तापलं आणि त्यातून सुजय विखे ट्रोल झाले! खरं तर त्यांची यात चुकच झाली. कोणती भाषा बोलता येते याहीपेक्षा तुम्हाला त्यातील व्यवहारी ज्ञान आहे का हे जास्त महत्वाचं! सुजय विखे न्युरो सर्जन म्हणजे उच्च शिक्षीत! मात्र, त्यांनी नीलेश लंके यांच्या शिक्षणाचा मुद्दा न काढता त्यांनी इंग्रजी- हिंदी बोलून दाखवावं असं खुलं आव्हान दिले आणि ते लागलीच ट्रोल झाले! मागील निवडणुकीत अशोक विखे यांच्या भाषणातील काही मुद्दे सोयीस्करपणे क्रॉप करण्यात आले आणि सुजय विखे यांच्याबद्दल संशयाचे मळभ तयार करण्यात आले. दुसरीकडे नीलेश लंके यांच्या दहावी- आयटीआयपर्यंतच्या शिक्षणाचा मुद्दा अन् एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना दिलेल्या डॉक्टरेट पुरस्काराचा मुद्दाही ट्रोल झाला. अर्थात दोन-तीन वर्षांपूर्वी लंके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केली हेही अनेकांना माहिती नसावे! उमेदवाराला भाषा कोणती बोलता येते? त्याचे शिक्षण किती याहीपेक्षा तो जी भाषा बोलतो ती भाषा सामाजिक भान जपणारी आहे का हे जास्त महत्वाचे! उमेदवार आणि त्याचे बगलबच्चे उठसुठ दबंगशाही, गुंडागर्दी अन् हप्तेखोरीची भाषा बोलत असतील, गावागावातील सामाजिक भान बिघडवत असतील तर त्याची किंमत त्या- त्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना मोजावी लागणारच! उमेदवार कोणत्या पक्षाचा किंवा त्याची आणि त्याच्या पक्षाची विचारसरणी कोणती यावर निवड न करता तो सुशिक्षित आहे का? सर्वसामान्य नागरिकांसाठी तो सहज उपलब्ध आहे का? त्याचा मतदारसंघाबाबत अभ्यास आहे का? त्याचा जनसंपर्क आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या उमेदवारामध्ये दिसतील असाच प्रतिनिधी जनतेने निवडायला हवा!

भारतीय लोकशाहीची रचना आणि व्यवस्था पाहता आपल्याकडे पदवीधर- शिक्षक असा एखादा दुसरा मतदारसंघ वगळता कोणत्याही निवडणुकीत शिक्षणाची अट नाही हे दुर्दैवच! देशासह राज्याचे कारभारी निवडताना त्याचे शिक्षण किती असावे हे ठरवणारी घटनादुरुस्ती करावी हे आतापर्यंत कोणालाच वाटले नाही आणि ते वाटणारही नाही! कारण कायदेमंडळात जे सदस्य आपण निवडून देतो त्यातील कितीजण शिक्षीत असतात हा मुलभूत प्रश्न आहे. सुजय विखे यांनी परवा नगरमध्ये बोलताना उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का हा वादाचा मुद्दा छेडला! त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रीया उमटल्या सर्वश्रूत आहेत. काहींना त्यांचे पणजोबा म्हणजेच विठ्ठलराव विखे पाटील आठवले! पन्नास- साठ वर्षांचा काळ बदलला असताना सुजय विखे यांनी व्यक्त केलेल्या भावनांमध्ये चुकीचे काही आहे असे वाटत नाही. मात्र, त्यांनी वापरलेली दर्पोक्तीची भाषा चुकीची! खरंतर या विषयाची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला तर त्याची अजिबातच गरज नव्हती असे त्याचे सरळसरळ उत्तर!

लोकसभा निवडणुकीतील तुमच्या भागातील खासदार शिक्षीत असावा की नाही याचे सर्व्हे अनेकांनी केले. त्यात वृत्तवाहिन्यांनीही आपला टिआरपी मिळविण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार- पाच दिवसात विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी या विषयावर केलेल्या सर्व्हेक्षणाचा मतीतार्थ पाहता जवळपास ८० टक्केपेक्षा मतदारांनी त्यांचा लोकसभेचा उमेदवार हा सुशिक्षीत असावा असंच मत व्यक्त केलंय! अर्थात हा सर्व्हे राज्याच्या कानाकोपर्‍यातील विविध संस्था आणि न्युज चॅनल्स वाले यांनी केलाय. सामाजिक प्रक्रियेतून राजकारणात सक्रिय होत असताना आणि जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यास सज्ज होत असताना आपण नक्की कोणाचं प्रतिनिधीत्व करतोय आणि त्यांच्यासाठी आपण काय देणं लागतोय याचे आत्मपरीक्षण उमेदवारांनी देखील करणे गरजेचे असते आणि आहेच!

मतदार आणि जनतेचा विचार केला तर त्यांच्यासमोर प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्यासाठीचं इलेक्टींग मेरीट असणारा उमेदवार देत राहिली असल्याचे इतिहास सांगत आला आहे. त्यामुळे आता वर्तमानात कोणताही राजकीय पक्ष नवा इतिहास घडावा म्हणून इलेक्टींग मेरीट नसणारा म्हणजेच अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार यांच्यासारखा उमेदवार देऊन आपलं संख्याबळातील एक डोकं (जागा) का कमी करुन घेईल. बहुमत मिळविण्याच्या एका खेळात आता प्रत्येक राजकीय पक्षाला डोकी (सदस्य) मोजायची आहेत! त्याला कोणीच अपवाद नाहीत! मग, अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी उच्च शिक्षीत उमेदवार देण्याची अपेक्षा ठेवली तरी ती पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही. लोकसभा, विधानसभापासून ते अगदी ग्रामपंचायतपर्यंत आपण आलो तरी इलेक्टींग मेरीटच विचारात घेतले जाते आणि त्यावरच त्याची उमेदवारी आणि विजयाची गणितेही ठरवली जातात. जात- धर्म याच्या जोडीने भावनेचा खेळ हा त्यात आलाच!

उमेदवार निवडताना राजकीय पक्ष त्यांच्या भूमिका नक्कीच बदलणार नाहीत! कारण त्यांना सोशल इजिनिअरींग करायचं असतं आणि जाती-पातीला आम्ही कसं सांभाळतो हे दाखवायचं असतं! एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या जातीला त्यांच्या उमेदवारांच्या संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये स्थान दिलं नाही तर लागलीच त्या जातीचे ‘ठेकेदार’ जागे होतात आणि आमच्या जातीला राज्यात कोठेच स्थान न दिल्याने आम्ही अमूक- तमूक राजकीय पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवणार, अशी धमकी देऊ लागतात! खरेतर ही धमकी त्यांच्या टेंडरपुरती मर्यादीत असते. एकदा का त्यांचे टेंडर झाले की ही धमकी गायब होते हे लपून राहिलेले नाही.

उमेदवार त्यांचा ते निवडणार असतील तर आपल्या भागाचा प्रतिनिधी तर आपण निवडू शकतो आणि त्यासाठी घटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा हक्क तर आपण बजावू शकतो ना! मतदानाचा हा हक्क बजावताना माझा खासदार- आमदार कसा असावा याचे भान आपण जपलेच पाहिजे! निवडून गेल्यानंतर तो त्याच राजकीय पक्षात राहील याची खात्री आज कोणीच देऊ शकत नाही. तो त्याचा घोडेबाजार करत असतोच आणि करणारच! मी माझ्या सहकार्‍यांना आणि मतदारांना विश्वासात घेऊन निर्णय घेतलाय, हे फक्त आणि फक्त सांगण्यासाठीच असते. घोडेबाजारात खोक्यांचा खेळ कसा होतो आणि त्यातून दहा पिढ्यांचा उद्धार होईल असं गणित कसं बसवलं जातं हे सार्‍यांनीच याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले! विश्वासार्हता तपासलीच पाहिजे आणि तो तर मतदाराचा हक्कच आहे.

उमेदवार जर त्याच्या फायद्यासाठी चार- चार महिन्यात भूमिका बदलत असेल, नेता बदलत असेल तर तो तुमच्याशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. त्यामुळे त्याचे शिक्षण- त्याला अवगत असणारी भाषा हे मुद्देच दुय्यम ठरतात! उमेदवार आणि त्याचे बगलबच्चे उठसुठ गावागावातील सामाजिक शांतता बिघडवत असतील तर असा उमेदवार पुढे काय दिवे लावणार याचा धोकाही समजून घेण्याची गरज आहे. उमेदवार गरीब कुटुंबातून आला श्रीमतं कुटुंबातून हेही महत्वाचे नाही! त्याच्या दहा पिढ्या राजकारणात राहिल्या की तो नवखा, गरीब, सामान्य कुटुंबातील उमेदवार आहे हेही महत्वाचे नाही. तो सामाजिक भान जपतो का हे जास्त महत्वाचे आहे. त्याचा अलिकडच्या काही वर्षातील इतिहास काय सांगतोय हेही तपासण्याची गरज आहे. तो जर त्याच्या भागात उच्छाद मांडत आला असेल आणि त्याची पिलावळ जर त्या-त्या गावात भांडणतंटे, हप्तेखोरी, गुन्हेगारी, वाळू तस्करीतील असेल तर त्याच्याकडून तुम्ही वेगळ्या त्या काय ठेवणार?

उमेदवार सातवी शिकलेला चालेल! त्याला नीट मराठी नाही बोलता आले तरी चालेल पण प्राप्त सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर आज प्रत्येकाला त्याच्या कुटुंबातील मुलगा- मुलगी सुरक्षीत राहावे असे वाटते! शाळा- महाविद्यालयात तीची छेडछाड काढणार्‍या टोळीला प्रोत्साहन देणारा, मुलगी पळवून नेल्यानंतर त्या मुलाला पाठीशी घालणारा सैराटांचा नेता नक्कीच खासदार- आमदार म्हणून निवडला जाणार नाही याची काळजी तर प्रत्येकजण घेणार आहेच! दबंगगिरी, गुंडागर्दी, हप्तेखोरीला आळा घालणारा, सैराटांच्या टोळीला न पोसणारा आणि गावागातील सामाजिक भान, एकोपा, जुन्याजानत्यांना मान सन्मान देतानाच नवतरुणांचा आदर्श ठरेल असे काम करणारा व जोडीने या सर्वांना सहजासहजी उपलब्ध होईल असा लोकप्रतिनिधी जनतेला हवाय! नगर- शिर्डीचा विचार केला तर आता प्रमुख उमेदवार ठरलेत! आणखी काही उमेदवारांची त्यात भर पडेलही! मात्र, निर्णय जनतेला घ्यायचा आहे! भावनेच्या लाटांचे दिवस संपले असले तरी चेहरे आणि त्या चेहर्‍याआड लपलेला खरा चेहरा ओळखण्याची गरज आहे.

उमेदवाराला इंग्रजी नाही आलं तरी चालेल पण जिल्ह्यातील सामान्यांचे सुखी संसार फुलवणारा, त्यांच्या लेकीबाळी सुरक्षीत राहतील याची काळजी वाहणारा आणि मी- माझी टोळी याच्याही पलिकडे माझ्या मतदारसंघासाठी मला संसदेतून काहीतरी आणायचे आहे याचे सामाजिक भान जपणारा खासदार जनतेने निवडण्याची गरज आहे आणि त्यातच शहाणपण आहे!

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...