श्रीगोंदा । नगर सहयाद्री-
तालुक्यात अनके दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे उद्योजक, व्यापार्यांसह नागरिक हैराण झाले आहे. तालुक्यातील वीज प्रश्नावर आवाज उठवत व्यापार्यांच्या वतीने महावितरणच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यापूर्वी देखील २० मे २०२४ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी एस.डी ओ. श्रीगोंदा यांच्या वतीने ३१ मे पूर्वी सर्व मेंटेनस ची कामे तसेच प्रलंबित कामे करण्यात येतील असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र याउलट सद्यपरिस्थितीत कुठलीही कामे झाले नसुन विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे अनेक व्यापारी, नागरिक हैराण झाले आहेत. तसेच कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार नाही.
श्रीगोंदा शहरातील जुनी लाईन दुरुस्त करण्यासाठी साहित्य नाही. अशा अनेक तक्रारी असून यासंबंधी महावितरणच्या अधिकार्यांना माहिती देऊन कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसल्यामुळे महावितरण कंपनीचा कारभाराविरोधात नागरिकांच्या वतीने शहरातील शनी चौक तेली गल्ली, होनराव चौक, संत रोहिदास चौक, बस स्टँड परिसर, भैरवनाथ चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यावेळी सतीश बोरुडे, मा. उपनगराध्यक्ष राजू गोरे, ऋषिकेश गायकवाड, विशाल सकट, राम घोडके, गणेश काळे, युवराज पळसकर, वसीम शेख, वसीम ताडे, पांडुरंग पोटे आदीसह नागरिक उपास्थित होते. आंदोलनात जमा झालेली रक्कम अधीक्षक अभियंता खांडेकर, कार्यकारी अभियंता माळी, तसेच सुर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
आमचा संयम संपला!
श्रीगोंदा शहरात आजचे भीक मांगो आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात केले असून भीक घेतल्यामुळे तरी अधिकारी सुधारतील अशी अपेक्षा आहे. आता आमचा संयम संपला आहे. वीज प्रश्न न सुटल्यास अधिकार्यांना खुर्चीवर बांधून कोंडून ठेवणार आहे.
-टिळक भोस
शहरात विजेचा खेळखंडोबा
श्रीगोंदा शहरात विजेचा खेळखंडोबा मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे .त्यात सुधारणा व्हायला तयार नाही.त्यामुळे आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे.
सतीश बोरुडे