spot_img
अहमदनगरअहो, पट्टेच ते! वाळूवाले अन् खाणपट्टेवाल्यांचा मोह कुणासाठी? बाळासाहेब थोरातांचे खाणीचे अन्...

अहो, पट्टेच ते! वाळूवाले अन् खाणपट्टेवाल्यांचा मोह कुणासाठी? बाळासाहेब थोरातांचे खाणीचे अन् राधाकृष्ण विखे पाटलांचे वाळूचे पट्टे नक्कीच नाहीत! सामान्यांचे काय?

spot_img

वाळूवाले अन् खाणपट्टेवाल्यांचा मोह कुणासाठी?
सारिपाट / शिवाजी शिर्के
महूसलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात या दोघांचीही ताकद मोठी आहे. त्यांचा आवाकाही मोठा आहे. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता या दोघांमध्येही आहे. मात्र, या दोघांचा बराचसा वेळ एकमेकांची जिरविण्यातच जातो अशी चर्चा कधीच लपून राहिलेली नाही. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यासमोर दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी अवकाळीचा फटकाही बसला आहे. वाळू आणि खाणपट्टे हे जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे आजतरी विषय नाही. मात्र, तरीही याच मुद्यावर दोघांनीही एकमेकांना समोरासमोर न येता समर्थकांच्या माध्यमातून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे लपून राहिलेले नाही. निवडणूका संपल्या असताना आता या दोघांनीही जिल्ह्याच्या हिताचा विचार करण्याची आणि त्यातून जनतेच्या प्रश्नांचा निपटारा कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाळूवाले आणि खाणपट्टे वाले हे दोघेही कधीच कोणाचे नसतात! सत्ता जिकडे असेल तिकडे ते असतात! उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर याच जिल्ह्यात वाळू वाहतूक करणारे शेकडो हायवा आणि जेसीबी- पोकलॅन भंगारात विक्रीला निघाल्यास आश्चर्य वाटू नये! आपण नक्की कोणाचे प्रतिनिधीत्व करतोय आणि त्यातून कोणाचे भले होत आहे याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. प्रशासन त्यांच्या सोयीने काम करणार आहेच! फरक इतकाच की आज ते विखेंच्या बाजूने करेल आणि उद्या थोरात सत्तेत आले तर हेच प्रशासन त्यांच्या बाजूने! सामान्य जनतेचे आणि त्यांच्या प्रश्नांचे काय? वाळू आणि खाणपट्टे यांच्या माध्यमातून मिळवला जाणारा बक्कल पैसा आणि त्यातून निर्माण होणारे गुंड, त्यांना पाठीशी घालणारे नेते यांचे काय हाही दुसरा प्रश्न आहेच!

संपूर्ण राज्यात सर्वश्रूत असणारा थोरात- विखे हा संघर्ष पुन्हा एकदा उभा ठाकला आहे. यावेळी फरक इतकाच आहे की, दोघांनीही त्यांच्या समर्थकांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि निशाणा एकमेकांवर धरला आहे. दोघांच्याही समर्थकांचे खांदे मजबुत असून चाप ओढणार्‍या विखे- थोरात या दोघा आजी- माजी महसूलमंत्र्यांच्या वादात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा कस लागणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व असणार्‍या भागातील म्हणजेच प्रवरा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची तक्रार होताच लागलीच संगमनेरमधील खाणपट्टे बंद करण्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आले. गौणखनिजाच्या मुद्यावर दोघांनीही एकमेकांना कोंडीत पकडले. आता या निर्णायक लढाईत प्रशासनाने निर्णायक भूमिका घेतली तर दोघांच्याही समर्थकांवर गुन्हे दाखल होणार आणि कोट्यवधी रुपयांच्या दंडाच्या नोटीसाही निघणार! विखे- थोरात यांच्यातील संघर्षाचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अधिकच स्पष्टपणे समोर आल्यास आश्चर्य वाटू नये!

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात असणार्‍या मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्रवरा नदी पात्रामध्ये शासनाच्या वाळू ठेयाचा आडून सुरु असणार्‍या बेसुमार वाळू उपशास विरोध केला. त्या विरोधात राहुरी तालुयातील सात्रळ,सोनगाव, धानोरे तसेच राहाता तालुयातील कोल्हार ,भगवतीपुर ,हनुमंतगाव, पाथरे येथील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन केले. वाळू उपशाला स्थगिती देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

तीन- चार दिवस हे आंदोलन चालू असताना आंदोलनस्थळी भेट देणार्‍यांमध्ये प्रामुख्याने विखे विरोधकांचा भरणा जास्त राहिला. अर्थात ते स्वाभाविकच होते. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, श्रीरामपूरचे आ. लहु कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, दादाभाऊ कळमकर, डॉ. सुधीर तांबे, राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, संजय पोटे, प्रभावती घोगरे, अशोक कदम, सुरेश थोरात, रामेश्वर सोलट ही नगर शहराबाहेरील मान्यवर जसे यात सहभागी झाले तसेच नगर शहराचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे यांनीही आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दर्शवला. चौथ्या दिवशी हे उपोषण आश्वासनानंतर सोडण्यात आले.

माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात असणार्‍या संगमनेर तालुयातील निमोण तळेगाव कौठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांची भेट घेवून याबाबतचे निवेदन सादर केले. भीमराज चतर, अमोल खताळ, संदीप देशमुख, शरद गोर्डे, श्रीनाथ थोरात, नवनाथ जोंधळे, मयूर दिघे, किसनराव चतर, बाबा आहेर, श्रीकांत गोमासे, महेश मांडेकर आदींनी तक्रारींचा पाढाच वाचला. संगमनेर तालुयात माती मिश्रीत वाळूचे लिलाव मोठ्या प्रमाणात झाल्याची तक्रार करण्यात आल्यानंतरही त्याची दखल अधिकार्‍यांनी न घेतल्याने शासनाच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माती मिश्रीत वाळूचे लिलाव कसे झाले शासन नियमांची अंमलबजावणी झाली का याची संपूर्ण चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी आशी मागणी शिष्टमंडळाने केली.

तालुयात सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर तसेच खाण पट्टे शासनाचे सर्व नियम व अटीचे पालन न करता सुरू आहेत. या व्यवसायिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे या भागातील पर्यावरण पूर्णपणे धोयात आले असून, या अवैध खाणीमुळे शेतातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मर्यादेपेक्षा जास्त खोदाई करून शासनाच्या अधिकार्‍याची दिशाभूल केल्याने शासनाच्या महसूलाचेही मोठ्या नूकसान होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

थोरात- विखे हे दोघेेही राज्यातील हेवीवेट कारभारी! दोघांच्यातील विळ्याभोपळ्याचे सख्यही सर्वश्रूत! लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात जाहीरपणे घेतलेली उडी आणि विरोधी उमेदवाराला पुरवलेली रसद हा विषयही चर्चेत राहिला. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास काही दिवसांचा कालावधी बाकी असताना प्रवरा परिसरातील वाळू उपशाचा मुद्दा ऐरणीवर आला. मुळा- प्रवरा संवर्धन समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते अरुण कडू आणि सहकारी हे गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करत आले आहेत.

या सर्वांना बाळासाहेब थोरात यांची रसद असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. वाळू उपशाच्या मुद्दावर विखे विरोधकांनी उपोषण सुरू करताच थोरात विरोधकांची मोट कोणी बांधली हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. अर्थात थोरात आणि विखे हे दोघेही एकमेकांना शह- काटशह देण्यासाठी कशी खेळी खेळतात आणि कोणत्या सोंगट्या कशा टाकतात हे काल- परवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. महसूल खाते सांभाळणार्‍या या दोघांनाही कशापद्धतीने सांभाळून घ्यायचे आणि दोघांचेही समाधान कसे करायचे याचा कस सध्या सिद्धाराम सालीमठ यांचा लागला आहे.

विखे समर्थकांच्या काय आहेत मागण्या?
*संगमनेर तालुयात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा.
*माती मिश्रीत वाळूचे लिलाव कसे झाले ?
*माती मिश्रीत वाळू लिलाव करताना नियमांची अंमलबजावणी झाली का याची संपूर्ण चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करा.
*सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करा
*पर्यावरण धोक्यात आणणार्‍या क्रशरवर कारवाई करा
*खाणपट्टे खोदाईत मर्यादेचे उल्लंखन
*शासनाचा महसूल बुडविणार्‍यांवर कारवाई करा
*गौणखनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करा

थोरात समर्थकांच्या काय आहेत मागण्या?
* कुठलीही परवानगी नसताना प्रवरा नदीमध्ये बोटीने बेसुमार वाळू उपसा.
*पाणी पूर्णपणे गढूळ, पाण्यावर डिझेल व ऑइलचा तवंग. त्यामुळे पाणी दूषित होऊन जनावरांच्या पाण्याचा प्रश्न.
*नियमांपेक्षा अतिरिक्त खोल वाळू उपसा
*विहिरीचे कठडे २५ ते ३० फूट उंच झाल्यामुळे मोटर सोडणे मोटर काढणे पाईप फुटणे पाईपचा मेंटेनन्स करणे अवघड.
*वाळू वाहतूकदार ओव्हरलोड वाहतूक करत असल्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान
*सर्व वाळूचे ठेके बंद ठेऊन त्वरित चौकशी करा.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...