लोकल ट्रेन, रस्ते ठप्प, अंधेरी सबवे पाण्याखाली
मुंबई / नगर सह्याद्री –
मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये आज (१८ ऑगस्ट) पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, आणि वांद्रे या परिसरांमध्ये जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थितीमुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे.
मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी
हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. उद्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरातील शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने पत्रक जारी केले आहे.
रस्ते वाहतूक : सलग कोसळणाऱ्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहने पार्किंगमधील गाड्यांप्रमाणे रांगेत अडकली आहेत. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून, साधारण २.५ ते ३ फूट पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सायन, भांडुप, कुर्ला, चेंबूर, आणि दहिसर यासारख्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे.
लोकल ट्रेन : पावसामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे (Central Railway) च्या वाहतुकीत ५ ते १० मिनिटांचा उशीर आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे येणाऱ्या जलद गाड्या ५ मिनिटे आणि हार्बर मार्गावरील गाड्या ७ ते ८ मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे (Western Railway) च्या गाड्या ८ ते १० मिनिटे उशिराने सुरू असून, हायवे लाइन वरही ४ ते १० मिनिटांचा उशीर आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक आणखी बाधित होण्याची शक्यता आहे.
विमान वाहतुकीवर परिणाम
पावसामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. इंडिगो, अकासा एअर, आणि एअर इंडिया यांनी प्रवाशांना विमानतळाकडे लवकर येण्याचा आणि उड्डाणाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवासाला अधिक वेळ लागत आहे.
धरणांमधील पाणीसाठा ९० टक्के
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात धरणांमधील पाणीसाठा ९०.६८% पर्यंत पोहोचला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माहितीनुसार, धरणांमध्ये सध्या १३,१९,६४० दशलक्ष लिटर पाणी आहे. तुळशी तलाव १००% भरला असून, तानसा (९८.८१%), मध्य वैतरणा (९७.३४%), आणि विहार (९५.१६%) धरणांमधील पाणीसाठा लक्षणीय आहे. यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.
नांदेडमध्ये आभाळ फाटलं; ५ जण दगावल्याची भीती, ४० जनावारांचा मृत्यू
मागील ४८ तासांत नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. रात्रीत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे १८ फूट पाणी वाढले अन् सहा गावं पाण्याखाली गेली. एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये आतापर्यंत पाच जण दगावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हसनाळमधील एक व्यक्ती आणि चार महिला पूराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. मुक्रमाबद येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचे पाणी शिरून 40 जनावरे गुदमरून मृत्यू तर 20 जनावरे वाहून गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात पूर्व परिस्थिती सांगताना गावकऱ्यांनी हंबरडा फोडला. याची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. त्यामधील शब्द ऐकून डोळ्यातून टचकन पाणी येईल. “आमच्या गावात एक गडी मेला, चार बाया वाहून गेल्या त्या अजून सापडल्या नाहीत. एकाएकी पाणी आलं, मागचा दरवाजा मोडून लेकराला आणि सुनेला बाहेर काढलं. सामान गेलं दोन लाख रुपये आणून ठेवले होते तेही गेले. साडेचार महिन्याचे लेकरं घेऊन माळाला आलो. पैसा गेला, सोनं गेलं, जीव वाचवा म्हणून माळावर आलो,” असे शब्द त्या ऑडिओ क्लीपमध्ये आहेत.
नांदेडमध्ये पावसाने हाहाकार मुखेड तालुक्यात ढगफुटी सुदृश्य पाऊस
लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ व ढगफुटी ,अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली , हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकले. त्यातील काही नागरिकांना काढण्यात एसडीआरएफ जवानांना यश आले आहे.
मुखेड तालुक्यातील रावनगाव येथे अंदाजे 225 नागरिक पाण्याच्या वेढयामध्ये अडकलेले होते, त्यातील काही नागरिकांना एसडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आलेले आहे. 7 ते 8 लोक झाडावर अडकले होते, त्यांना देखील सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. उर्वरित लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा –
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. रविवारी येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे.
मुंबईतील पावसाचा विमान वाहतुकीलाही तडाखा
मुंबईत सुरू असेलल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतुकीला बसला आहेच. शिवाय आता हवाई वाहतूकही पावसामुळे बाधित झाली आहे. रात्रीपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि वातावरण खराब झाल्यामुळे मुंबईत विमान उतरण्यात अडचणी येत आहेत. सकाळपासून नऊ विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले आहे. तर काही विमानांना गो-अराऊंड करण्यात आले आहे. तर खराब हवामानामुळे एक विमानाला दुसरीकडे वळविण्यात आले आहे.
मुंबईतून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी आता महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास विमान कंपन्यांना सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपनीकडे विमानाची सद्यस्थिती तपासावी आणि त्याप्रमाणे विमानतळावर पोहोचावे, असेही सांगण्यात आले आहे.
इंडिगोने केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, “मुंबईतील पाऊस कमी झालेला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून विमानतळाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक मंद गतीने सुरू आहे. जर तुम्ही आज तुमचे विमान असेल तर आमची विनंती आहे की, तुम्ही लवकर विमानतळावर येण्यासाठी निघावे. तसेच आमच्या वेबसाइट आणि ॲपद्वारे विमानाच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवावे.”
“मुंबई, बंगळुरू, गोवा आणि पुणे या शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक मंदवण्याची शक्यता आहे. तुमचा विमान प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी विमानतळावर वेळेवर पोहण्यासाठी वेळेचे नियोजन करावे”, असे आवाहन आकासा एअरने केले आहे.
मुंबई विमातळाच्याही सूचना
मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज पाहता प्रवाशांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानाची स्थिती तपासावी आणि विमानतळावर पोहोचण्यासाठी वेळेचे नियोजन करावे, अशी पोस्ट मुंबई विमानतळाने एक्सवर टाकली आहे.
7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
जून आणि जुलै महिन्यात महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस ऑगस्ट महिन्यापासून जोरदार बरसत असून मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून मोठं नुकसान झालं आहे. अशातच आज प्रादेशिक हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी हवामान अंदाज जारी करत मुंबईसह राज्यातील सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर या भागात आज अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई विभागात 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट यादरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हा अंदाज आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता IMD च्या कुलाबा वेधशाळेने हे अपडेट जारी केले.
परभणीला पावसाने झोडपलं, नद्यांना पूर, येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले, अलर्ट जारी
मागील चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळेच परभणी जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्यांना पूर आला आहे. गोदावरी पूर्णा आणि दुधना नदी दुधडी भरून वाहत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यांमध्ये प्रमुख दोन धरणं आहेत. त्या येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे येलदरी धरणाचे दहा दरवाजे उघडले असून तब्बल 56 हजार किंवा पाणी सोडण्यात आले आहे तर दुसरीकडे लोअर दुधना धरणातून 2600 ने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीपाचे पिकाचे नुकसान होत आहे आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत आणि तात्काळ पंचनामे करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी कभी गमचा माहोल आहे एकीकडे चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी खुश असला तरी असाच पाऊस पडत राहिला तर खरिपाच्या पिकाचे नुकसान होणार आहे त्यामुळे कुठेतरी तो अहवाल दिला असल्याचे दिसून येत आहे.
परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत 474 मिलिमीटर पावसाची नोंद
परभणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी सरासरी 761 मिलिमीटर पाऊस पडत असतो. त्याच्या तुलनेत आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये तब्बल 474 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकूण सरासरीच्या 62.4% एवढा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये झाला आहे. परभणी जिल्हा जून आणि जुलै या दोन महिन्यांमध्ये ३०७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती जो 84.3% एवढा पाऊस झाला होता. तुलनेने ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. ऑगस्ट महिना अद्याप संपलेला नसला तरी आत्तापर्यंत एका महिन्यात 167 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 126 टक्के पाऊस झाला आहे. मागील बारा तासात परभणी जिल्ह्यातील जवळपास 12 मंडळामध्ये अतिवृष्टी जाहीर करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.
येलदरी धरणाच्या दहा तर लोअर दुधच्या चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग
परभणी जिल्ह्यामध्ये प्रमुखता दोन धरणे आहेत ज्यावर परभणी जिल्ह्याचं जीवनमान अवलंबून आहे परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी धरण 100% भरले आहे येलदरी धरणाच्या दहा दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे तब्बल 56 हजार क्यू सेक्स ने येलदरी जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. येलदरी धरणातून पाण्याचा विचार केल्यामुळे खाली येणाऱ्या सिद्धेश्वर धरणाचे देखील सर्वच्या सर्व दरवाजे उघडले आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात दुसरे धरण लोवर दूध नाही ते देखील पूर्णपणे भरले असून त्याच्या चार दरवाजा मधून 262 ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर गोदावरी नदीला देखील पूर आला आहे त्यामुळे गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात असलेले सर्वच मॅरेजे शंभर टक्के भरले आहेत चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील प्रमुख तीनही नद्या दुधडी भरून वाहत आहेत.
राज्यात तुफान पाऊस अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेशकुमार, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आपत्ती व्यवस्थापन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.
बैठकीत विभागीय आयुक्तांनी आपल्या विभागातील पावसाबाबतची माहिती सादर केली. रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
मुंबईत आज सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस अलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
घरांच्या पडझडीसाठीची मदत, पंचनामे योग्य पद्धतीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. धोक्याची पातळी वाढण्यापूर्वी अन्य राज्यांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. पर्यटकांच्या ठिकाणी पोलिसांनी सतर्क रहावे, दरडी कोसळणाऱ्या भागात आधीच यंत्रणा कार्यरत करावी, तसेच निवारा केंद्रात भोजन, शुद्ध पाणी व पांघरूण यांची पुरेशी सोय करावी, असे आदेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.