मुंबई । नगर सहयाद्री:-
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं असून, मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील १२ जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अतिवृष्टीमुळे मागील २४ तासांत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. याशिवाय ४२ गुरांचा मृत्यू झाल्याचंही नोंदवण्यात आलं आहे.
अलर्टमध्ये असलेले जिल्हे?
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
लातूर आणि नांदेडमध्ये स्थिती गंभीर
लातूर जिल्ह्यातील ६० पैकी २९ महसूल मंडळांत नद्या-नाल्यांमध्ये पाण्याची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून, मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जवळपास ५० रस्ते आणि पूल बंद करण्यात आले आहेत. निलंगा-उदगीर-धनेगाव मार्ग बंद करण्यात आला असून, मांजरा नदीवरील पूल बुडाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेलगी गावात वीज कोसळून ५ गुरांचा मृत्यू झाला आहे. चाकूर तहसीलमधील बीएसएफ कॅम्पमधील केंद्रीय विद्यालयात पाणी शिरल्याने अडकलेल्या ६७९ विद्यार्थ्यांना आणि ४० शिक्षकांना बीएसएफ जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
राज्य सरकारचा अधिकृत अहवाल
महाराष्ट्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केलेल्या आपत्ती व्यवस्थापन अहवालानुसार, मृत्यूंची नोंद चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांतून झाली आहे. पावसामुळे नांदेड जिल्ह्यातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, तेथूनही अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
शाळांना सुट्टी, प्रशासन सज्ज
लातूर जिल्ह्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, NDRF आणि आपत्ती निवारण दल सतर्क असून, संभाव्य धोका लक्षात घेता मदतकार्य व स्थलांतर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.