Maharashtra Weather: राज्यात अवकाळी पावसाने उडवलेली धांदल अजून शमलेली नाही. एकीकडे तापमानात मोठी वाढ तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या तीन दिवसांत हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिणेकडून आलेल्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हवामान सतत बदलत आहे. मागील दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने 29 मार्चला (IMD) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.या भागांमध्ये 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
घाटमाथा परिसरालाही या पावसाचा फटका बसणार आहे. रत्नागिरीत काही भागांत हलक्या सरींची नोंद होणार असून, पावसाच्या या सरी अचानक येणाऱ्या ढगांच्या गडगडाटासह बरसतील. 30 मार्च रोजी सुद्धा हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरासाठी पावसाचा इशारा दिला आहे. सातारा आणि बीड जिल्ह्यांतही हलक्या स्वरूपाच्या सरी पडतील. धाराशिव भागातही असाच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मार्च महिन्याच्या शेवटी आलेल्या या हवामान बदलांमुळे शेतकरी आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.31 मार्च रोजीही कोकण, पश्चिम महाराष्ट्र, बीड आणि धाराशिव भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दुसरीकडे, राज्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेचा जोर वाढणार असून, दिवसा तापमान 2 ते 5 अंशांनी वाढू शकतं. काही ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या विरोधाभासी हवामानामुळे वातावरण पूर्णपणे अस्थिर बनले आहे.