अहमदनगर । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. तर बळीराजा सुखावला आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी २४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने दोन दिवस रेड आलर्टचा इशारा देखील दिला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तसेच शेतकर्यांनी खरीपाची पेरणीही मोठ्या प्रमाणात केली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तब्बल १५ दिवस पाऊस गायब झाल्याने पिकांनीही माना टाकल्या होत्या. त्यामुळे शेतकरी राजा ही आभाळाकडे नजरा लावून बसला होता. परंतु, सोमवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस
नगर २३.५, पारनेर १२.४, श्रीगोंदा ३१.८, कर्जत २९.५, जामखेड ७७, शेवगाव १२.८, पाथर्डी ५५.९, नेवासा २१.१, राहुरी १५.२, संगमनेर १५, अकोले १७.८, कोपरगाव १०.२, श्रीरापूर १४.३, राहाता १३ मिलीमिटर पाऊसांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सहा ठिकाणी अतिवृष्टी
सोमवारी सायंकाळी नगर जिल्ह्यात दमदार पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील मिरजगाव ८०, जामखेड ९३.५, खर्डा ९२.३, नायगाव ९३.५, माणिकदौंडी ११७ , टाकळी ६६.३ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नगर तालुका पारनेर, जामखेड, राहुरी, शेवगाव, कर्जत, पाथर्डीयासह मोठा भिज पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा
भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्ह्यात दोन दिवसांत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शयता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये, विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅटर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.