अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक ३ ते ४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक,अहिल्यानगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धरणांमधून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे १२,०३८ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ६,३१० क्युसेक, जायकवाडी धरणातून २८,२९६ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १,३५६ क्यूसेक,ओझर बंधारा २,७५७ क्युसेक, मुळा धरणातून ३,००० क्युसेक, घोड धरणातून ४,००० क्युसेक, सीना धरणातून ३,३९३ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ५०० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून १,२२० क्युसेक, खैरी धरण येथून ५१९ क्सुसेक इतका विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना सूचना
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्स् पासून दूर रहावे.
जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी,
विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.
धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी (Selfie) काढू नये.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे-नाल्यांवरील पुल व बंधा-यांवरुन पाणी वाहत असल्यास पुल/बंधारे ओलांडू नये.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे.
जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे
जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.