मुंबई | नगर सह्याद्री
राज्यात सध्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, आजही हवामानशास्त्र विभागाकडून राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ६ जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे या सहा जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
मुंबईसह या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये यलो अलर्ट
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने अहमदनगरमध्ये दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच २१ व २२ जुलै रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तर जिल्ह्यात सरासरी १०० मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी पिण्याच्या पाण्याची समस्या अद्यापही सुटलेली नाही. त्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.