श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यामध्ये यावर्षी रब्बी हंगामासाठी २७६६३ हेक्टर क्षेत्रामध्ये विविध धान्यांचा पेरा झाला असून अन्य पिकांसह गहू व कांदा पिकाची परिस्थिती उत्तम असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शशिकांत गांगर्डे यांनी ‘नगर सह्याद्री’ शी बोलताना दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील २७६६३ हेक्टर क्षेत्रापैकी १२३१२ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ११५८७ हेक्टर क्षेत्रावर गहू,३७६४ हेक्टर क्षेत्रावर मका असा पेरा तृणधान्यांचा झाला आहे. तसेच १६९४२ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड असा पेरा रब्बी हंगामामध्ये श्रीगोंदा तालुक्यात होतो. श्रीगोंदा तालुका हा रब्बी हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळामध्ये पारंपारिक मका पिकाचे क्षेत्र घटले असून गव्हाचे क्षेत्र वाढण्याऐवजी कांदा पिकाला शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली असल्याची माहिती शशिकांत गांगर्डे यांनी दिली.
यावर्षी तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पेरा केलेल्या गव्हाच्या पिकाची परिस्थिती सध्या हे पीक हुरड्यात असून चांगले उत्पादन निघण्याचे अपेक्षा कृषी विभागासह शेतकऱ्यांनी ही व्यक्त केली आहे. विविध पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येतोय. डाळिंब, द्राक्ष ,पपई आदी फळबागांसह सर्वच पिकांना श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनुकूल आणि पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी विविध पिके घेऊ लागलेले आहेत. यावर्षी गव्हाच्या पिकाचा पेरा ही समाधानकारक असून मागील काळात गहू पिकास पोषक वातावरण निर्माण झाल्याने कांदा व गव्हाचे पीक जोमदार आलेले दिसत आहे.
उन्हाचे चटके, लाईटचे झटके
यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात गहू, मका, कांदा, उसाची लागवड केली. मात्र वेळेवर वीज मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचं चित्र श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथे पाहायला मिळत आहे. विहिरींना पाणी देखील उपलब्ध आहे. मात्र वीज वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.