अहमदनगर। नगर सहयाद्री
एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.भरधाव डंपरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ११ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाथर्डी येथे घडली. नितीन पवार (वय २८, रा. वाघोली, ता. शेवगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर रेणुका पवार (वय २५) अशी गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,अहमदनगरच्या पाथर्डी येथे खडी वाहणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरने दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. या घटनेत नितीन पवारचा जागीच मृत्यू झाला, तर रेणुका पवार गंभीर जखमी झाली आहे. पाथर्डी-नगर रस्त्यावरील हॉटेल प्रशांतसमोर ही घटना घडली.रेणुका पवार हिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष दुर्दैवाची बाब म्हणजे या दांपत्याचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अपघातानंतर धडक दिलेला डंपर उलटला असून, डंपर चालक फरार झाला आहे. विना क्रमांकाचा डंपर असल्याने हा डंपर नेमका कुणाच्या मालकीचा आहे हे पोलीस तपासात उघड होणार आहे. पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.