Accident News: तीन मुली अन् बापाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. चौथी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. गुजरातमधील गोधराजवळ शुक्रावारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक व्यक्ती आपल्या मुलींसोबत दुचाकीवरून निघाला होता, त्यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले. अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरून सर्वजण दूर फेकले गेले. तीन मुली आणि बापाचा जागेवरच मृत्यू झाला.
एका भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एक मुलगी गंभीर जखमी आहे. मुलीवर गोधरा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गोधरा-वडोदरा महामार्गावर बायपासजवळ तृप्ती हॉटेलजवळ शुक्रवारी भीषण अपघात झाला.
३६ वर्षीय रजेंद्र चौहान हे आपल्या चार मुलींसह मोटारसायकलवरून गोधरा बायपासजवळील सरंगपूर गावी लग्न समारंभासाठी निघाले होते. त्यावेळी तृप्ती हॉटेलजवळ गोधरा बायपासवर असताना एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात जानू (९), मनीषा (१२) आणि वर्षा (१३) यांचा मृत्यू झाला. तर नयना (३) गंभीर जखमी आहे. नयनाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.