अहिल्यानगर । नगर सह्याद्री
राज्य शासनाच्या आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून महानगरपालिकेने हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला होता. या आराखड्यावर मुदतीमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत 40 हरकती दाखल झाल्या आहेत.
एक हरकत वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. अनेकांची एकच हरकत वेगवेगळ्या नावाने दाखल असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नकाशासह प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यात आलेली आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. काही अर्जांमध्ये एकसारखी व एकच हरकत असल्याने त्याचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
तर, एक हरकत ईमेल द्वारे वेळ संपल्यानंतर दाखल झाली आहे. या सर्व अर्जावर 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. हरकत नोंदवणाऱ्यांनी सुनावणीसाठी सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी म्हटले आहे.