अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल हा अर्धवट असल्याबाबत त्रिसदस्यीय समितीने अस्वीकृती प्रमाणपत्राच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे अपूर्ण कागदपत्रे व तपासणीता शासनाच्या एसओपीचे पालन झालेले नसल्याने ते सादर करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व संंबंधित अहवाल तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली असून मनपा आरोग्य अधिकारी या पदावर रुजू करून घ्यावे अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.
डॉ. बोरगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात विविध पत्रांचा संदर्भ दिला आहे. माझी नेमणूक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 45 नुसार करण्यात आली आहे. कलम 58 अन्वये एक महिन्यापेक्षा अधिक काळ सक्तीच्या रजेवर ठेवण्याकरिता शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय मला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. हा आदेश शासनाच्या पूर्वपरवानगी शिवाय व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे उल्लंघन करून काढलेला आहे. आरोग्य विभागाच्या रँकिंगमध्ये 26 क्रमांकाहून 16 व्या क्रमांकापर्यंत जानेवारी 2025 अखेर प्रगती झालेली आहे.
मला कुठलीही संधी न देता नेमलेल्या समितीने अर्धवट कागदपत्रांच्या आधारे अहवाल तयार करून व तपासणीबाबतचे नियम डावलून बोगस अहवाल तयार केलेला आहे. अपूर्ण व अर्धवट कागदपत्रांच्या अहवालाचा आधार घेऊन मला कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. बोगस अहवालाच्या आधारे माझ्यावर महानगरपालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बोगस व अर्धवट कागदपत्रांच्या व त्रिसदस्यांचे अहवाल व साक्षी घेऊन व प्रकरणाची संपूर्ण शहानिशाकरुन संदर्भ क्रमांक-9 अन्वये कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामधून मी निर्दोष असल्याने माझे नाव वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार माझे निलंबन आपोआप संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे मला वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर संपूर्ण सन्मानाने तात्काळ रुजु करुन घेण्यात यावे. तसेच निलंबन कालावधीतील सर्व वेतन, भत्ते तात्काळ अदा करण्यात यावेत, असे डॉ. अनिल बोरगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.