मुंबई । नगर सहयाद्री:-
वातावरणाच्या लहरीपणामुळे कधी गारठा, तर कधी उकाडा असा अनुभव सध्या येत आहे. ऐन थंडीच्या कालावधीत विषम हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होऊ लागली आहे. सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गच्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांत जात आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत पहाटे गारवा तर दुपारी उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. जानेवारी महिन्यातही काहीशी अशीच परिस्थिती होती. मुंबईकरांना यंदा दरवर्षीसारखा गारठा अनुभवता आलेला नाही. थंडीच्या हंगामात फारच कमी वेळा १३ ते १६ अंशादरम्यान किमान तापमान नोंदले गेले. याउलट किमान तापमानही अनेकदा वाढतच गेले होते. किमान आणि कमाल तापमानामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळेच सध्या अबालवृद्ध सर्दी, खोकल्याने त्रस्त आहेत.
दिवसेंदिवस तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस मुंबईच्या तापमानाचा पारा ३६ अंशापार गेला होता. मुंबईत सध्या दुपारच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऋतुबदलाच्या या काळात सध्या पहाटे गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी तापत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अजूनही किंचित गारवा आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २२.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईच्या किमान तापमानातही वाढ होत आहे. दरम्यान, तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.