Rain Update: राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांत आज शनिवारी (दि. 28) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (शनिवारी) राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, हवेमध्ये काही प्रमाणात गारवा होता. शनिवारी देखील पुण्यात दुपारनंतर हलक्या स्वरूपात सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. शुक्रवारप्रमाणेच आजही (शनिवारीही) आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रविवारपासून मात्र संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज (शनिवारी) मात्र कमाल तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात शनिवारी किमान तापमानात चार अंशांनी वाढ होऊन ते 19 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
शनिवारी कोकणात हवामान कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे.
उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यातील हवामान खात्याकडून जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गोंदिया, नागपूर, जालना, बीड, भंडारा, चंद्रपूर, जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.