Maharashtra Crime News: मेफेड्रोन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याकडून मेफेड्रोन पावडर व एक मोबाईल असा एकूण 3 लाख 17 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मेफेड्रोन अंमली पदार्थ विकणार्या महिलेला अटक केल्यामुळे शिक्रापूर परिसर नशेली पदार्थांचा हब झालाय का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. जबीन जावेद शेख (वय 38 वर्षे, रा.गल्ली नंबर 2, पिंपळे गुरव, पुणे) या महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर तीनही पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात ड्रग सदृश पदार्थांची विक्री होत असल्याची शिरूर तालुक्यात चर्चा होती. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शिरूर तालुक्यात अंमली पदार्थाचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकला तपसादरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, कोरेगाव भिमा डिंग्रजवाडी फाटा येथे एक महिला अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सदर ठिकाणी जाऊन पोलीस पथकातील महिला पोलीस अंमलदार पूजा सावंत यांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची विचारपूस केली असता महिलेने तिचे नाव जबीन जावेद शेख (रा.पिंपळे गुरव, पुणे) असे सांगितले. सदर महिलेच्या पर्स ची तपासणी केली असता पर्समधून प्लास्टिकची पारदर्शक पिशवी व त्यामध्ये हाफव्हाईट रंगाची 15.85 ग्रॅम वजनाची पावडर (मेफेड्रोन अंमली पदार्थ ) व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 3 लाख 17 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.