निघोज । नगर सहयाद्री:-
कुकडी डाव्या कालव्याला दि. 11 डिसेंबर पर्यंत आवर्तन सोडणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थ शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, विश्वनाथ चौधरी आदीं उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे यांचा आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पारनेर तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच गोधन संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांनी कुकडी डावा कालव्याला आवर्तन सोडण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांना मागणी करीत चर्चा केली होती.
याबाबत आमदार दाते यांनी गुरुवार दि.5 रोजी सकाळी दहा वाजता मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. व कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली यावेळी वळसे पाटील यांनी लगेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधीत याबाबत कुकडीला दि.11 पर्यंत पाणी सोडण्याची सुचना केली. अधिकाऱ्यांनी ही सुचना तत्काळ मान्य करीत दि 11 डिसेंबर पर्यंत पाणी सोडणार असल्याचे सांगितले आहे. आमदार दाते यांनी तातडीने पाण्याचा प्रश्न माग लावल्यामुळे कुकडी डावा कालवा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी आमदार दाते यांचे आभार मानले आहेत.
तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही
कुकडी डावा कालवा पट्यात तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांचा समावेश असून जवळपास हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येत आहे साधारण डिसेंबर ते मे महिन्यात या भागात पाण्याची टंचाई निर्माण होते. यासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव भागात धरणे असल्याने पाणी हे पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येत असल्याने या भागातील लोकप्रतिनिधींना त्यांच्या वर अवलंबून राहावे लागते. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते व आंबेगावचे आमदार व ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा समन्वय चांगला आहे. सहकार्य करणारे वळसे पाटील हे आमदार दाते यांचे मार्गदर्शक मित्र आहेत म्हणून पाच वर्षे याच समन्वयातून पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.