माळीवाडा येथील शनी मारुती मंदिरात विशेष महापुजा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
माळीवाडा येथील शनी-मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 6 वा. जन्मोत्सवाच्यावेळी श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते अभिषेक करुन महापुजा करण्यात आली. भजनी मंडळाच्या महिलांनी पाळणा हलवून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देवस्थानचे सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त रंगनाथ फुलसौंदर, विजय कोथिंबीरे, नितीन पुंड, राजेश पारीख, आनंद सत्रे, लक्ष्मीकांत हेडा आदिंसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर फुलांसह आकर्षक सजावट करण्यात आली होती.
नगर शहरामध्ये विविध मंडळांनी हनुमान जयंतीनिमित्त विविध मंडळांनी आकर्षक अशा मुत उभारुन जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शहरातील विविध तालिमीमध्ये आकर्षक रोषणाई करुन युवकांनी कावडीने आणलेल्या पाण्याने अभिषेक करण्यात आले. नगर शहरातील स्टेट बँक चौक, सर्जेपुरा, दिल्लीगेट, लक्ष्मी कारंजा, माळीवाडा, नेप्तीगेट, झेंडीगेट, नेता सुभाष चौक, नालेगांव, वारुळाचा मारुती, नवग्रह मंदिर, भुतकरवाडी, श्रमिकनगर, पावन हनुमान मंदिर, बालिकाश्रम रोड, खाकीदास बाबा मठ, नित्यसेवा सोसायटी, मार्कंडेय सोसायटी गुलमोहोर रोड, तपोवन, भोसले आखाडा, अरणगांव रोड, रेल्वेस्टेशन, केडगांव, एकनाथनगर, भिंगार येथील रोकडेश्वर मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठीसाठी रांगा लावल्या होत्या. रुईच्या पानांचा हार, मंदिराबाहेर नारळ, टरबुज-खरबुजाचा प्रसादाचे आयोजन करण्यात होते.
कौठीची तालिम, नानापाटील वस्ताद, वाडिया पार्क तालिम, गणपतीची तालिम, सातपुते तालिम, झारेकरगल्ली आदिं ठिकाणीची तालमींवर रोषणाई करुन सजावट करण्यात आली होती.हनुमान जयंतीनिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर शहरात चौका-चौकात हनुमान चालिसा पाठाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ, लक्ष्मीनारायण सत्संग मंडळ, श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ, मंगल भक्त सेवा मंडळ आदि मंडळाने शहरात व उपनगरात हनुमान चालिसाचे पठण करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.संकटमोचन हनुमान सत्संग मंडळाच्या वतीने माळीवाडा शनी-मारुती मंदिर येथे पहाटे हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते.