अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर व उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी कोठला परिसर, कोंड्यामामा चौक, फलटण चौकी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
सोमवार दि. 16 डिसेंबरपासून शहर व उपनगरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरुवात केली आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्यासुचना दिल्या होत्या. काहींनी अतिक्रमणे काढून घेतली परंतु अतिक्रमणे काढून न घेतलेल्यांवर मनपाने कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. शहरासह उपनगरातील रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे.
सोमवारी रोड लगत असणारे लोखंडी बोर्ड, कुरेशी हॉटेल बोर्ड हटवण्यात आला, तसेच मावा, फिटर टपरी, शेड लोखंडी पत्रे ,चहा स्टॉल शेड व टपरी हटवण्यात आली. कोंड्या मामा चौक ते राज चेंबर कोटला रोड च्या दोन्ही बाजूला असणारे टपऱ्या, हातगाड्या, वडापाव चहा टपरी, शेड हटविले. फलटण चौकी लगत असणारे अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी प्रभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.