अहिल्यानगर । नगर सहयाद्री
समाज प्रबोधनकार हभप संग्रामबापू भंडारे महाराज यांच्यावर घुलेवाडी गावातील काँग्रेस समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या वाहानाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला असून हे मोठे षडयंत्र व सुनियोजित कट आहे. हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच समाज प्रबोधनकार हभप संग्रामबापू भंडारे महाराजांच्या जीवास धोका असल्याने त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना सोमवारी दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, समाज प्रबोधनकार हभप संग्रामबापू भंडारे महाराज हे घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहात कीर्तन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रतिपादन करत होते. त्यावेळी घुलेवाडी गावातील काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक समाजकंटकांनी चालू कीर्तनात गोंधळ निर्माण करून आरडाओरडा करत कीर्तन बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या समाजकंटकांनी त्यांच्या वाहनांवर मोठ मोठे दगड टाकून वाहनाचेही मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.
या प्रकारामुळे कीर्तनासाठी जमलेल्या माता भगिनी व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले व त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या समर्थक समाजकंटकांनी केलेला हा हल्ला हिंदुत्वाच्या प्रखर विचारांवर केलेला हल्ला असून हे मोठे षडयंत्र व सुनियोजित कट आहे. समाज प्रबोधनकार संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लाखोराना अटक करून त्यांचा बोलवता धनी कोण आहे याचा छडा लावणे आवश्यक आहे. ते काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयीन कर्मचारी पदाधिकाऱ्यांना चिथावणी देणाऱ्यांचा सुद्धा पर्दाफाश करणे आवश्यक आहे घुलेवाडी येथे झालेल्या गंभीर घटनेची दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी व समाज प्रबोधनकार हभप संग्रामबापू भंडारे यांना पोलीस संरक्षण द्यावे.