कलावंतांमुळे महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचली : मुनगंटीवार
कर्जुले हरेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा
मुंबई /नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्येही आणखी वाढ करण्यात येईल.
त्याचसोबत, वृद्ध कलावंतांच्या पेन्शन योजनेच्या निधीतही वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आदींसह अनेक पुरस्कारांचे वितरण मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले.
यावेळी आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत मानाचा असलेला राज्य सरकारचा ’ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ आळंदी येथील डॉ. नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते त्यांना १० लाख रुपये, मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. जाधव मुळचे नगर जिल्ह्यातील कर्जुले (ता. पारनेर) या गावचे आहेत. घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने त्यांची पावले अध्ययनासाठी आळंदीकडे वळली. तेथे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत त्यांनी संत साहित्याचा अभ्यास सुरू केला. आळंदीतील गोपाळपुरा येथे आनंद आश्रमातील आनंदस्वामी ऊर्फ दन्तेस्वामी यांच्याकडे बरीच वर्षे राहून त्यांनी वारकरी पद्धतीचे शिक्षण घेतले.
एकनाथी भागवत, विचारसागर, ज्ञानेश्वरी, वृत्तीप्रभाकर, पंचदशी अशा अनेक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. वारकरी शिक्षण देणारी संस्था आळंदीत उभी करून त्यांनी शेकडो कीर्तनकार, प्रवचनकार, साधकांना घडविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.