अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन व परिवर्तन या चतु:सूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या विचार भारती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत ‘पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे’ भव्य आयोजन अहिल्यानगर मध्ये दिनांक २३ ते ३१ मे या दरम्यान करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त खास या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदुंचे असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा. तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान व पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनावरील धगधगती हिंदी नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौका जवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर होणाऱ्या या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या लोगोचे अनावरण नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले आहे तसेच या महोत्सवानिमित्त एका खास गौरव गीताचे रचना करण्यात आली असून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर नीरज करंदीकर व प्रसाद सुवर्णपटकी हे या गौरव गीताचे संयोजन करत आहेत, अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली.
पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाची माहिती देण्यास आयोजित पत्रकार परिषदेस महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा धनश्री विखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाचे, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, अनिल मोहिते, बाबासाहेब वाकळे, निखील वारे, रवींद्र बारस्कर, मनोज झंवर आदी उपस्थित होते. पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचा स्वागताध्यक्षा धनश्री विखे म्हणल्या, शनिवार दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी प्रोफेसर कॉलनी चौकातील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर प्रख्यात हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांचे महिला सबलीकरण काळाची गरज या व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी साडे सहा ते आठ या वेळेत करण्यात आले आहे. तसेच रात्री आठ वाजता विश्व मांगल्य सभा निर्मित ‘राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा’ या भव्य हिंदी नाटिकाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाची यशोगाथा या नाटिकेतून सदर होणार आहे. ही नाटिका व सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी सर्वंनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धांची माहित देताना रवींद्र बारस्कर म्हणाले, अहिल्यानगरमध्ये दिनांक २३ मे रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ ते ५ या वेळेत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा संपन्न होणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सबलीकरणाचे प्रतीक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक हे विषय देण्यात आहेत. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर भाषण करतानाचे स्वतःचे व्हिडिओ संयोजकांकडे पाठवायचे असून त्याचे परीक्षण होऊन प्राथमिक फेरीतून निवडलेल्या वीस स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजर, तृतीय ५ हजार व उत्तेजनार्थ २००० व १००० रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तसेच दिनांक १५ ते २० मे या दरम्यान भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर शहरात करण्यात आले आहे. स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी पेपर आयोजक देणार असून शहरातील सर्व भागांमधील सेंटरमध्ये स्पर्धकांना हे पेपर उपलब्ध होणार आहेत. दिनांक १५ ते २० मे या दरम्यान स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर चित्र काढून ज्या ठिकाणाहून पेपर घेतला आहे त्या सेंटरमध्ये चित्र जमा करावयाचे आहेत. स्पर्धेसाठी गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी विषय आवडते मंदिर, आवडता किल्ला व अहिल्यादेवी यांनी प्रस्थापित केलेले शिवलिंग. गट क्रमांक दोन इ.आठवी ते दहावी विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील एक प्रसंग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची यांनी नदीकिनारी बांधलेले घाट. गट क्रमांक तीन खुला गट व व्यावसायिक चित्रकार विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले शिवमंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मारकाची तुमची काल्पनिक प्रतिमा हे विषय देण्यात आले आहेत. प्रत्येक गटातून उत्कृष्ट दहा बक्षिसांची निवड करण्यात येणार असून बक्षीस तिन्ही गटातील ३० पात्र चित्रकारांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित शोभायात्रा व सांकृतिक कार्य्कार्माची माहिती देताना जनसेवा फाउंडेशनचे निखिल वारे म्हणाले, गुरवार दिनांक २९ मे रोजी अहिल्यानगर शहरात भव्य व आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता दिल्लीगेट येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा लालटाकी, प्रेमदान चौक मार्गे जॉगिंग ट्रॅक प्रोफेसर कॉलनी चौक येथे दहा वाजता संपेल. माजी खासदार डॉ.सुजय विखे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील भव्य व आकर्षक चित्ररथांचा तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदुंचे असलेल्या सर्व स्थळांच्या चित्ररथांचा समावेश असणार असून अनेक विविध कलाकारांची उपस्थिती व लोक नृत्यचा समावेश यात असणार आहे. या महोत्सवानिमित्त महिलांसाठी एका भव्य लकी ड्रोचे आयोजनही करण्यात आले असून न्भाग्य्वान महिला भगिनीस चारचाकी गाडी, दुचाकी गाडी व इतर अनेक आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.
दिनांक शुक्रवार ३० मे रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत प्रोफेसर कॉलनी चौक येथील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर भव्य संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात अहिल्यानगरचे स्थानिक कलाकार आपली कला व अहिल्यानगरचा वैभवशाली इतिहास सादर करणारे आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी सकाळी चौंडी येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी नगर शहरात सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवास राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय व अहिल्यानगर महानगरपालिकेने सहकार्य केले आहे, अशी माहिती बाबासाहेब वाकळे यांनी दिली.