रायगड । नगर सहयाद्री:-
शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखंड भारताचे प्रेरणास्थान आहेत, असे ठाम मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावरील ३४५ व्या पुण्यतिथी अभिवादन सोहळ्यात व्यक्त केले. स्वतःला ‘आलमगीर’ म्हणवणाऱ्या औरंगजेबाचा पराभव महाराष्ट्रात झाला आणि त्याची कबर देखील इथेच आहे, असेही ते म्हणाले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्ताने आज रायगड किल्ल्यावर आयोजित भव्य अभिवादन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराजांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते.
जिजाऊंनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजीला स्वराज्याचा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे महान कार्य त्यांनी केले,” असे अमित शाह यावेळी म्हणाले. रायगडावरील सुवर्ण सिंहासनाच्या ठिकाणी शिवरायांना अभिवादन करताना आपल्या मनातील भावना शब्दांत मांडणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. “स्वराज्य आणि स्वधर्मासाठी शिवरायांनी संपूर्ण आयुष्य वेचले. आदिलशाही आणि निजामशाहीने वेढलेल्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्यात रूपांतरित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले,” असेही शाह म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या जन्मकाळात महाराष्ट्र अंधारात बुडाला होता, स्वधर्म आणि स्वराज्याबद्दल बोलणे गुन्हा मानले जात होते, असे सांगत शाह यांनी शिवरायांच्या साहसाची थोरवी अधोरेखित केली. “शिवरायांनी भगवा झेंडा फडकवण्याची आणि स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. मी अनेक नायकांची चरित्रे वाचली, पण शिवरायांसारखे साहस आणि पराक्रम एकाही नायकात दिसले नाही,” असे शाह म्हणाले.
रायगडावरून देशासाठी एक महत्त्वाकांक्षी संकल्प व्यक्त करताना शाह म्हणाले, “आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरून संकल्प करत आहोत की, जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारत जगात क्रमांक एकवर असेल.” त्यांनी शिवरायांचा वारसा हा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून, तो देशाला आणि जगाला प्रेरणा देणारा असल्याचे अधोरेखित केले.
शिवाजी महाराजांनंतरच्या काळात औरंगजेबाच्या आक्रमणांना मराठ्यांनी कसे तोंड दिले, याचा उल्लेख करताना शाह म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाविरुद्ध अथक लढा दिला. त्यामुळेच त्याची कबर याच मातीत बांधली गेली.” मराठ्यांच्या या पराक्रमामुळे स्वराज्याचा गौरव कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.
महापुरुषांंचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे हीच आमची भावना: देवेंद्र फडणवीस
उदयन महाराजांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत आम्ही योग्य कारवाई करणार आहोत. आमचं तर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरुन ढकलून द्यावं अशीच आमची भावना आहे. शिवस्मारक सुप्रीम कोर्टात अडकलं होतं. कुठल्याही परिस्थितीत हे स्मारक झालं पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच दिल्लीत शिवस्मारक झालं पाहिजे ही मागणीही योग्यच आहे. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाऊ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.