अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अस्मानी-सुलतानी संकटाने पिचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांनीही घेरल्याचे दिसत आहे. अवकाळीचा फटका आणि आयात-निर्यात शुल्कामुळे उत्पादनखर्चही वसूल हाेणे मुश्किल झालेले असताना व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे धनादेश स्वरुपात दिले. मात्र धनादेश न वटल्याने व्यापाऱ्याने तब्बल ७ लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी शेतकरी फकिरा बाबुराव पवार (वय ५४, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार द्राक्ष व्यापारी मोहम्मद अकील मोहम्मद शमसु रेयान (रा. डॉल नं. ०२, कलमना मार्केट, नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
द्राक्ष व्यापारी मोहम्मद अकील मोहम्मद शमसु रेयान यांनी शेतकरी बाबुराव पवार यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या द्राक्ष बागेतील द्राक्षे वेळोवेळी खरेदी केली, मात्र त्या विक्रीची रक्कम दिली नाही. फिर्यादीने वेळोवेळी मागणी केली असता व्यापाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि पैसे देण्यास टाळाटाळ केली.
व्यापाऱ्याने दिलेले धनादेश फिर्यादीने त्यांच्या खात्यात वटवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने ते वटले गेले नाही. डिसेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत सदरचा प्रकार घडला. अखेरीस, मोहम्मद अकील या व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यानतंर शेतकरी बाबुराव पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार नगर तालुका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे हे करीत आहेत.



