श्रीरामपूर । नगर सहयाद्री:-
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात आणि तेथील हिंदूंच्या मागे भारतीय हिंदू खंबीरपणे उभा असल्याचा संदेश देण्यासाठी व शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य भूमिका घेऊन हिंदू समाज हिताचे पाऊल उचलावे, या मागणीसाठी उद्या मंगळवारी (दि. १०) मानवाधिकार दिनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत पत्रकात बेग यांनी म्हटले आहे की, बांगलादेशातील हिंदू समाज बांधवांवर आजपर्यंत सतत अन्याय अत्याचार होत आले आहे. त्यावर कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी याअगोदर आवाज उठवलेला नाही, नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्थादेखील हिंदूंवरील अत्याचारास पाठबळ देत असल्याचे सिद्ध झालेले असून तो चिंतेचा विषय आहे.
त्यामुळे मानवाधिकार दिनी राज्यभरात ८ व १० डिसेंबर रोजी दोन टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू एकत्र येऊन शासनाला निवेदन देणार आहे. त्यातलाच एक भाग म्हणून उद्या मंगळवारी (दि. १०) श्रीरामपूर तालुक्यातील हिंदूंनी मोर्चात सहभागी व्हावे, असे बेग यांनी म्हटले आहे.