पारनेर । नगर सहयाद्री:-
विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि २९ ऑक्टोबर रोजी महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ महादू दाते यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने काशिनाथ दाते सर यांचा अर्ज भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. व शिवसेने कडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत नगर तालुक्याचे नेते संदेश कार्ले यांनी सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी शहरांमध्ये शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच माधवराव लामखडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील या प्रमुख नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता निवडणूक कशा पद्धतीने होणार व अर्ज माघारी कोण कोण घेणार याकडेच मतदारांचे लक्ष लागले आहे. गेल्याच आठवड्यात सुजित झावरे व माधवराव लामखडे विजय औटी यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता. परंतु ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर यांना महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी वेगळीच चूल मांडल्याचे दिसून आले. कार्ले हे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते तर सुजित झावरे यांनी साध्या पद्धतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर पारनेर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांमध्ये चढाओढ लागली होती.