नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
सराकरी कार्यालयात कर्मचारी जागेवर हजर नाहीत, असा अनुभव अनेकांना अनेकवेळी आला असेल. तसेच सकाळी वेळेवर कर्मचारी हजरही होत नाहीत. वेळेवर न येणार्या कर्मचार्यांना चाप लावण्यासाठी केंद्राच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने आता नवे निर्देश काढले आहेत. देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील सर्व ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.१५ पर्यंत कार्यालयात हजर व्हावे आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर निहित वेळेत कर्मचारी कार्यालयात हजर झाले नाहीत, तर त्यांचा हाफ डे लावण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.
केंद्रीय कर्मचार्यानी रजिस्टरमध्ये हजेरी न लावता केवळ बायोमेट्रिक हजेरी लावावी, असेही बजावले आहे. जर काही कारणांमुळे कर्मचारी कार्यालयात एखाद दिवशी हजर राहू शकले नाहीत. तर त्यांनी वरिष्ठांना त्याबद्दल माहिती देऊन सुट्टीसाठी अर्ज करावा, असेही आदेशात म्हटले आहे. करोना काळानंतर अनेक कर्मचार्यांनी बायोमेट्रिक हजेरी लावणे बंद केले आहे, ही बाब निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत.
कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने वरिष्ठ अधिकार्यांना त्यांच्या विभागातील कर्मचार्यांच्या हजेरीवर लक्ष ठेवण्याचेही निर्देश दिले आहेत. कर्मचार्यांचा हजेरीपट आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल अधिक जागरूक असण्याची अपेक्षा यात व्यक्त केली गेली आहे. केंद्र सरकारची बहुतेक कार्यालये ही सकाळी ९ पासून सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यरत असतात. मात्र अनेक कर्मचारी हे उशीरा येऊन लवकर घरी जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. थेट लोकांशी संबंधित असलेल्या विभागातील कर्मचारीही गंभीर नसल्यामुळे केंद्र सरकारने आता कडक पाऊल उचलले आहे.
आमच्या कामाचे तास निश्चित नाहीत, घरीही आम्ही काम करत असतो, तसेच सुट्ट्यांच्या दिवशीही काम करावे लागते, अशी खंत वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केली. करोना काळानंतर अनेक कामे डिजिटल झाल्यानंतर आता घरीही काम करावं लागत आहे. २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर कर्मचार्यांवर कार्यालयीन वेळ पाळण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. याचा अनेक कर्मचार्यांनी विरोध केलेला आहे.