अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; तातडीने पंचनाम्याचे आदेश
श्रीगोंदा। नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा-नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विविध अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आ. पाचपुते यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून धीर देत कोणीही खचून जाऊ नये. सरकार व आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आश्वासन दिले.
दि. 25 सप्टेंबर रोजी आ. पाचपुते यांनी घोगरगाव, बनपिंपरी, मांडवगण, आढळगाव, घोडेगाव, चांडगाव, शेडगाव, पेडगाव रस्ता, श्रीगोंदा शहर, बोरुडेवाडी, पारगाव सुद्रिक, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, काष्टी आदी गावांमध्ये भेटी देत शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले. या दौऱ्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही सहभाग घेतला.
त्यांनी देखील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे धरणे फुटणे, बंधारे वाहून जाणे, रस्त्यांचे मोठे नुकसान, तसेच शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी माती वाहून गेली असून शेतीसाठी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या पाहणी दौऱ्यात श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.