spot_img
ब्रेकिंगसरकार शेतकऱ्यांच्या बांधावर; दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन; कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; प्रचंड रोष अन्...

सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर; दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन; कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; प्रचंड रोष अन् गंभीर आरोप…

spot_img

राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
सोलापूर | नगर सह्याद्री
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वीच मदत मिळणा असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागाचे दृश्य पाहिले तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काल आम्ही जवळपास 2 हजार कोटी रिलीज केले. शेतकऱ्यांना मदत करणारच आहोत, पण त्यासोबत ज्यांच्या घराचं नकुसान झालेलं आहे. अन्नधान्याच नुकसान झालय, त्यांनाही मदत करणार आहोत. शासनाने हा निर्णय केलेला आहे की, कुठलेही अधिकचे निकष न लावता आवश्यकतेनुसार निकष शिथिल करुन नागरिक केंद्रीत मदत करायची आहे. नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेत मुजरांना मदत होईल अशा पद्धतीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेतङ्घ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे, त्यावर फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ बोली भाषेतली टर्म आहे.

पावसामुळे जे नुकसान झालय त्या सर्वाची नुकसान भरपाई, टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना ज्या सवलती दिल्या जातात, त्या सर्व सवलती देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पहिल्यांदा तातडीची मदत हा विषय महत्वाचा आहे, ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. केंद्र सरकारही मदत करणार आहे. एनडीआरएफला काही एडवान्स पैसे दिलेले असतात. ते खर्च करण्यास सुरुवात केली आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. जो काही निधी लागेल, तो देण्याच आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीर: उपमुख्यमंत्री पवार
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीकाचे मोठे नुकसान झाले असून हाती काहीच पीक न आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महिला शेतकऱ्यांनी स्वतः संवाद साधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपबीती सांगितली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

पालकमंत्री विखे पाटलांनी केली नुकसानीची पाहणी
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. होलेवाडी (तालुका कर्जत) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जलसंपदा व पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी पाहणी केली. याप्रसंगी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या सह सर्व अधिकारी, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

तिसऱ्या दिवशीही सीना नदीचा रस्ता बंद
अहिल्यानगर
सीना नदीच्या पुलावर पाणी आल्याने कल्याण रोड येथील नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. नदीच्या पुलाला कठडे नसल्याने अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सलग तिसऱ्या दिवशी सीना नदीचा रस्ता बंद असल्याने कल्याण रोड येथील नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.कल्याण रोडच्या नूतन पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने दुसरा पावसाळा उलटला तरी या पुलाचे काम झालेले नाही.कल्याण रोडच्या नागरिकांना अहिल्यानगरकडे येणारा सीना नदीचा पूल हा मुख्य रस्ता असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शाळेतील मुले, नोकरी करणारा वर्ग, शेतकरी वर्ग, व्यापारी, व्यावसायिक, अशा सर्वच लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाळवणी, नेप्ती, आळेफाटा, मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने एसटीची वाहतूक ही ठप्प झाली आहे. सीना नदीच्या पुलाचे काम कधी होईल हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेने माधवनगर येथून पर्यायी रस्ता मुरूम टाकून केला होता.परंतु वारुळाच्या मारुतीच्या रस्त्यावरील पुलावर पाणी येत असल्याने हा रस्ता ही बंद झाला आहे. विठाई लॉन्स, काटवन खंडोबा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे, चिखलमय रस्ता झाल्याने केडगाव लिंकरोड येथून सात किलोमीटर अंतरावरून कल्याण रोड येथील नागरिकांना येजा करावी लागत आहे. सीना नदीच्या नूतन पुलाचे काम कधी होणार हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लवकरात लवकर सीना नदीचा पूल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने सुरू करा; मंत्री विखे
तालुक्यातील होलेवाडी चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी पाहाणी केली .या भागातून जाणार्या कुकडी कालव्याच्या रूंदीकरणाचे आणि मजबुती करणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी कुकडी प्रकल्पाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले. कर्जत तालुक्यात होलेवाडी चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची पाहाणी करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेवून संवाद साधला.प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या आवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्या वस्त्यांपर्यत आले. यामुळे नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली. मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या अधिक्षक अभियंता श्रीमती अहीरराव यांना तातडीने या कामाचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासित करून त्यांनी सांगितले की अन्य काही काम ही जलसंधारण विभागाशी संबंधित असल्याने यासंदर्भात विभागाचे अभियंता गायमुखे यांनी गांभीर्याने निर्धारीत वेळेत याबाबत प्रस्ताव तयार करावेत त्यालाही मान्यता लगेच देत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. कमी लोकसंख्येची वस्ती असली तरी अनेक वर्ष पुलाची मागणी पूर्ण झाली नाही या तक्रारीचे गांभीर्य घेवून पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंता यांनी समन्वयाने काम सुरू कराण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत .अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून हे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आशा सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.रा ज्यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाचे गांभीर्य राज्य सरकारने घेतले असून सर्व मंत्री जनतेत जावून परीस्थिती जाणून घेत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. संजय राऊत रोज बोलले नाही तर, संपादक म्हणून त्यांची ओळख राहाणार नाही. त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देत नाही असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्ष पहील्या माळेला मी तिथे जातो. आम्हाला देवी प्रसन्न होते. सदावर्तेना होत नसेल तर त्यात माझा काय दोषॽ मंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकर्याचे दुख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टिका करतो याला आम्ही महत्व देत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना रेडकार्पेट पाहाणी दौरे कोणी केले त्याचे पुढे काय झाले आणि त्या सरकारच्या काळात काय घडले यावर आम्हाला बोलता येईल मात्र आजच्या परीस्थितीत राजकारण आम्हाला करायचे नाही. आशा शब्दात मंत्री देसाई यांनी आ.रोहीत पवार यांच्या समाज माध्यमावरील टिकेला उतर दिले.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधांवर; अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
गेल्या आठ दिवसांत दोनदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याची दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करत शेवगाव व पाथड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची शेतीच्या बांधांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत आ. संग्राम जगताप, आ. मोनिका राजळे देखील उपस्थित होत्या. त्यांनी भागातील नुकसानीची माहिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दोन वेळा झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, मका, आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक पाहणीनुसार, 2 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषीमंत्री भरणे यांनी बुधवारी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी दिल्या, शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे पूर्ण करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. शेवगाव, पाथड, नगर, नेवासा आणि अकोले तालुक्यांमध्ये दोन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील उभे पीके वाया गेले आहे. काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे अनेकांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

कृषीमंत्री बांधावर जाताच शेतकऱ्यांचा घेराव; प्रचंड रोष अन् गंभीर आरोप
राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा हवालदिल झाला आहे. मदतीची वाट पाहत आहे. काल मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. तसेच संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार महायुती सरकारमधील सर्व मंत्री पालकमंत्री संबंधित जिह्याच्या पाहणी दौऱ्यावर आले आहेत. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर आज जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. पण यावेळी कृषिमंत्र्यांना गरडा घालत शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामाना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना सामना करावा लागला.

शेतकऱ्यांनी आपली व्यथा कृषीमंत्र्यांना पुढे मांडल्या. जिल्हाधिकारी मॅडमने फळबागांचे पंचनामे करु नका, असे आदेश दिले असा आरोप शेतकऱ्यांनी केला. खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे प्रशासन करत नसल्याचे ऐकल्यानंतर कृषीमंत्री भरणे संतापले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्यांना फोन लावून फैलावर घेतलं. ज्याचं नुकसान झालं आहे ज्यांच नुकसान झालं आहे त्याचं नुकसान घ्या असं भरणेंनी अधिकाऱ्यांना सांगितलं. शेतकरी खूप अडचणीत आहे शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्या, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?
तुमचा रोष असणं साहजिक आहे, कारण ज्याच जळतं त्याला कळतं. तुमची काय चूक नाही, तुम्ही व्यथा मांडताय तुमची. मात्र, तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, असं आश्वासन शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांनी दिलं. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, तुम्हाला मदत करु. तुमची जमीन वाहून गेली असेल किंवा विहिरी बुजल्या असतील, अथवा घरांचे नुकसान झाले असेल तर त्याची नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर
तात्काळ मदतीची मागणी करत धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना घेरलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आले आहेत. शिंदेंसोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंतही उपस्थित होते. आज दुपारी एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहचल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांना घेराव घातला अन् तात्काळ मदत करा, अशी मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण धाराशिवकरांचा राग मात्र कमी झाला नाही. धाराशिवमध्ये पावसामुळे होत्याचे नव्हते झालेय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भुम,परंडा कळंब तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंञी प्रताप सरनाईक, मंञी प्रकाश आबिटकर हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. एकनाथ शिंदे हे कळंब तालुक्यातील आथर्डी, भूम तालुक्यातील पाथरूड, परंडा तालुक्यातील रुई या गावात पाहणी करणार आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहचल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शिंदे पाहणीसाठी पोहचले होते. पण त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

तीन दिवस आम्ही उपाशी, पुराचे गढूळ पाणी पिऊन दिवस काढले; सुटकेनंतर ग्रामस्थांचा संताप, डोळ्यात आनंदाश्रू
सोलापूर : जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोठा पाऊस झाल्याने नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. आभाळच फाटलंय, मग सांगायचं कुणाला अशी काहीशी परिस्थिती असून अनेक गावात पाणी शिरलं होतं. काही गावांत नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडल्याने ग्रामस्थांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अगदी अन्न आणि पाण्याविना तीन दिवस जीव वाचविण्यासाठीची धडपड येथील बरड वस्तीतील ग्रामस्थांनी केली. तीन दिवसानंतर पुराच्या पाण्यातून सुटका झाल्यानंतर डोळ्यात पाणी आणत त्यांनी आप बिती सांगितली.

माढ्यातील सीना नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याचा विळखा दारफळला बसल्यानंतर बरडवस्ती परिसरात जवळपास 32 लोकं अडकली होती. दोन दिवसानंतर काल एअरलिफ्ट करून यातील 10 जणांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, तरीही 22 लोक तीन दिवसापासून या पाण्याच्या विळख्यात घराच्या छतावर अडकून पडली होती. आपल्याला वाचवण्याचा प्रशासनाने कोणताही प्रयत्न केला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आज पुराच्या पाण्यातून बाहेर काढल्यानंतर या लोकांनी दिल्या. इंडिया रेपच्या टीमने या लोकांना आज सुखरुप बाहेर काढले, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते.

आम्हाला कुठलेही फूड पॅकेट मिळाले नाहीत, ना साधे पिण्यासाठी पाणी. तीन दिवस उपास सहन करुन पिण्यासाठी महापुराचे गढूळ पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आल्याचे आल्याचे या बाधितांनी सांगितलं. एअरलिफ्ट करायला आलेल्या हेलिकॉप्टरवर यांचा रोष होता. या हेलिकॉप्टरने एकदा दोन आणि नंतर आठ असे केवळ दहा लोकांना दोन फेऱ्यात बाहेर काढून परत ते हेलिकॉप्टर फिरकलेच नसल्याचा संताप त्यांनी बोलून दाखवला. पुराच्या पाण्यात अडकलेली आपली मुले आज परत आल्याचे पाहून त्यांचे कुटुंब भावनिक झाले होते. आपली लाडकी व्यक्ती परत आल्याचे पाहून त्यांच्या गळ्यात पडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. हर्नियाचे ऑपरेशन झालेले एक वयस्कर आजोबाही या अडकलेल्या 22 लोकांमध्ये होते. आठ दिवसापूर्वी ऑपरेशन होऊन, नंतर पुरात अडकल्याने 4 दिवस उपासमार सहन करावी लागल्याचे सांगताना कोणतेही औषध घेता आले नाही, असेही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

दरम्यान, या भागात पाण्याचा प्रचंड मोठा प्रवाह असल्याने यापूर्वीही NDRF च्या बोटी असूनही बरड वस्तीमध्ये जाता आलं नाही, येथे जाता आले नसल्याचे NDRF च्या अधिकाऱ्याने सांगितले. तर, आज पाण्याचा प्रवाह थोडा कमी झाल्यानंतर तीन बोटीने या लोकांना सुरक्षित काढल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

नंदूरबार / नगर सह्याद्री - नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर...

शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला असून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध; भूमिपुत्र संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक

पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे...

पारनेर तालुक्यात ‘आर्थिक’ सुनामीची लाट; ‘या’ पतसंस्थेत 81 कोटींचा अपहार

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81...