17,450 चालक-सहाय्यक पदांसाठी कंत्राटी भरती, 30 हजार रुपये पगार!
नगर सह्याद्री वेब टीम
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. तब्बल 17,450 चालक आणि सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून या भरतीसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे 30 हजार रुपये किमान मासिक वेतन मिळणार आहे. यासोबतच उमेदवारांना एसटी महामंडळाकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 300 व्या संचालक मंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भविष्यात येणाऱ्या 8,000 नवीन बसेससाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, ही भरती तीन वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने सहा प्रादेशिक विभागांनिहाय राबविली जाणार आहे. ई-निविदा प्रक्रियेद्वारे मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून घेतले जाणार आहेत. या प्रक्रियेमुळे प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा प्रदान करणे शक्य होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
तरुणांना रोजगाराची संधी –
या भरतीमुळे राज्यातील हजारो बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. कंत्राटी चालक आणि सहाय्यकांना 30,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार असून, प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम बनवले जाणार आहे. “ही भरती प्रक्रिया बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी आहे. होतकरू तरुणांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा,” असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.
राज्य सरकारचा बेरोजगारीविरोधी पवित्रा –
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एसटी महामंडळातील ही मेगाभरती जाहीर झाल्याने बेरोजगार तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियांना आता वेग येणार असून, सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.