पारनेर। नगर सहयाद्री-
लोकर प्रक्रिया केंद्राची स्थापना ढवळपुरी येथे करण्यात आली होती. मात्र जागा उपलब्ध नसल्याने हे केंद्र करंदी येथे हलविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र ढवळपुरी येथील मेंढपाळ बांधवांनी या परिसरात संख्या मोठी आसल्याने ढवळपुरीतच हे केंद्र व्हावे अशी मागणी खासदार डॉ.सुजय विखे यांच्याकडे केली होती. त्यास यश आले असून शासन निर्णय होऊन हे केंद्र आता ढवळपुरीतच होणार आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लोकरी पासून उबदार कपडे, स्वेटर आणि गालिचे अशा नित्योपयोगी वस्तू तयार करण्यासाठी करंदी येथे लोकरी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पारनेर तालुयातील ढवळपुरी, धोत्रे, ढोकी, वनकुटे, पळशी, भनगडेवाडी या परिसरातील धनगर समाजातील बांधवांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांची भेट घेत ढवळपुरी,वनकुटे परिसरात हा प्रकल्प उभा करण्यात यावा अशी मागणी मेंढपाळ समाज व संघटनांनी केली होती.
खासदार डॉ.विखे यांनी राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत करंदी येथील जागेत बदल करत ढवळपुरी येथील गट नंबर १०२९ मधील १.६३ आर क्षेत्र लोकर संशोधन केंद्र क्षेत्र वितरीत करणेकामी जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती. याअनुषंगाने विभागीय आयुक्त नाशिक यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
मेंढपाळ बांधवाचे हित जोपासले जाणार
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे ढवळपुरी मधील मेंढपाळ बांधवांनी लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र ढवळपुरीतच व्हावे अशी मागणी केली. या मागणीचा सकारात्मक विचार करत पुढील काही दिवसातच निर्णय घेत जागा उपलब्ध करत हे केंद्र ढवळपुरीतच होण्याचा शासन निर्णय झाला असल्याने आम्हा मेंढपाळ बांधवाचे हित जोपासले जाणार आहे. – कैलास नर्हे, ढवळपुरी