पारनेर । नगर सहयाद्री:-
तालुक्यातील कुकडी डावा कालव्यावरील पुलांच्या कामांस मंजुरी देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित झावरे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यामुळे यश आले आहे.
पारनेर तालुक्याच्या दक्षिण भागातील सोळा-सतरा गावांना समृद्धीच्या मार्गावर नेणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यातून सिंचन सुविधा मिळत असली, तरी या कालव्यावर आवश्यक पायाभूत सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कालव्यावर पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वस्तीवरून शेतामध्ये जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो, ही बाब विशेषतः पिंपळनेर, म्हसे, जवळा, नारायणगव्हाण, वडगाव गुंड, निघोज, अळकुटी परिसरातील शेतकऱ्यांसाठी गंभीर बनली आहे.
या प्रश्नाची गंभीर दखल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुजित झावरे पाटील यांनी घेत मुंबई येथे जलसंपदा मंत्री व राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी कालवा क्षेत्रातील विविध गावांमध्ये पूल व इतर पायाभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी मंजूर करून कामे हाती घेण्याबाबतचे सविस्तर निवेदन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना सादर केले.
सुजित झावरे पाटील यांनी या निवेदनात स्पष्टपणे मांडले की, कालव्यातून पाणी आल्यानंतर बागायती क्षेत्रात वाढ झाली असली तरी मूलभूत सोयीअभावी शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या शेतातील पोच रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही काळाची गरज आहे.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आवश्यक त्या सर्व पूल प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे कुकडी डाव्या कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतात थेट पोहोचण्यासाठीचा मार्ग सुकर होणार आहे. उद्योगी आणि कृषीप्रमुख तालुक्यातील पायाभूत विकासात हा मोठा टप्पा ठरेल, असा विश्वास तालुक्याच्या शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.