मुंबई । नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून ४१० कोटी रुपयांचा निधी वळता करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
या संदर्भात बुधवारी शासन निर्णय जाहीर करण्यात आला. योजनेसाठी एकूण ३९६० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असून, त्यातील ४१०.३० कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर हप्ता वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाने मिळालेला निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांसाठी वापरण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. तसेच, या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या संबंधित विभागाकडून त्वरीत उपलब्ध करून देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
विशेषतः, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना व इतर निवृत्त वेतन योजनांतील लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची स्पष्ट सूचना शासनाने दिली आहे.